परभणी : गंगाखेड शहरातील जनाबाई रस्त्यावरील एका वीट भट्टीवर काम करणाऱ्या चाळीस वर्षीय बापाच्या अंगावर मुलाने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बापाच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध रविवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील झोला येथील जयजयराम संभाजी टाळकुटे ( ४०, हल्ली मुक्काम जनाबाई रस्त्यावरील असलम खान यांची वीटभट्टी) येथे मागील सहा महिन्यापासून आपल्या कुटुंबासह काम करतात. १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास जयजयराम टाळकुटे यांनी आपल्या पत्नीस स्वयंपाक झाला का? असे विचारले. त्यानंतर स्वयंपाकच करत आहे, दिसत नाही का असे प्रत्यूत्तर पत्नीने दिले. त्यानंतर जयजय राम टाळकुटे दारू पीत घराबाहेर पडल्यानंतर त्यांचा मुलगा अजय टाळकुटे यांने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. त्यानंतर माचिसच्या काडीने पेटून दिले. त्यामुळे मोठा भडका झाला. यामध्ये जयजयराम टाळकुटे हे मोठ्या प्रमाणात भाजले.
त्यानंतर अस्लम खान व सलीम यांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने टाळकुटे यांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. या ठिकाणी जाळीत वार्डात उपचार घेताना जयजयराम टाळकुटे यांनी आपला मुलगा अजय टाळकुटे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अजय टाळकुटे याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगाखेड पोलीस करत आहेत.