परभणी : माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांची १९८२ मधील फेब्रुवारी महिन्यात परभणी येथे एकमेव सभा झाली. ही सभा आटोपल्यानंतर अटलजींना भूक लागली आणि त्यांनी जवळच्याच कार्यकर्त्यांना ‘अरे मुझे भूक लगी है’ असे सांगताच परभणीतील स्थानिक कार्यकर्त्यांची धावपळ झाली. एका कार्यकर्त्याने घरुनच आणलेल्या दोन पोळ्या आणि शिरा अटलजींनी चक्क रोल करुन कारमध्येच बसून खाल्ल्या, अशी आठवण येथील ज्येष्ठ पत्रकार व भाजपाचे तत्कालीन जिल्हा सरचिटणीस विजय जोशी यांनी ‘लोकमत’जवळ सांगितली.
तत्कालीन पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या विषयींच्या आठवणींना उजाळा देताना विजय जोशी म्हणाले की, १९८२ मध्ये नुकतीच भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती आणि अध्यक्षपदाचा पदभार तत्कालीन माजी परराष्ट्रमंत्री असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे होता. अटलजींची परभणीमध्ये सभा व्हावी, अशी माझी मनोमन इच्छा होती. त्यामुळे मी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस वसंतराव भागवत यांच्याकडे सभेचा आग्रह धरला आणि दिलेल्या शब्दानुसार अटलजींनी परभणीत सभा घेतली. परळी येथे कृषी मेळावा घेऊन अटलजी परभणीमार्गे नांदेडला जाणार होते. परभणीला ते चहाही घेणार नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले होते. परभणीत अटलजींची झालेली ही सभा विक्रमी ठरली.
परभणी येथील स्टेडियमच्या जागेवरील मैदानावर सायंकाळी ४ वाजता ते भाषणासाठी उभे राहिले. राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय विषयांपासून ते कार्यकर्ता कसा घडला पाहिजे, इथपर्यंत त्यांनी मार्गदर्शन केले. तब्बल पावणे दोन तास मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना भूक लागली आणि त्यांनी जेवणाची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यावेळेचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणपतराव गव्हाणे यांनी तातडीने घरी जावून आणलेल्या पोळ्या आणि शिरा अटलजींनी कारमध्येच बसून खाल्ल्या. अशी आठवण सांगतानाच अटलजींच्या त्या सभेला झालेली गर्दी विक्रमी होती. अटलजींची ही परभणीतील एकमेव सभा असल्याचेही विजय जोशी यांनी सांगितले.