भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे ह्या सोनपेठ तालुक्यातील पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी आल्या होत्या. यानंतर त्यांनी परभणीत पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची भेट घेतली. तसेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उमा खापरे म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यात गंभीर झाला आहे. मुंबईपाठोपाठ परभणी येथे अत्याचाराची घटना घडल्याने याविषयी चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सरकारने तातडीने बोलवावे; तसेच या सरकारने शक्ती कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावे. पीडित कुटुंबाला व मुलीला न्याय देण्यासाठी सरकारने योग्य ते पाऊल उचलावे, असे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेस महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष स्वाती जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, शालिनी कऱ्हाड, प्रिया कुलकर्णी, डॉ. विद्या चौधरी, मंगला मुदगलकर, विजया कातकडे, प्रभावती अण्णापूर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना विशेष अधिवेशनासंदर्भात पाठविलेल्या उत्तराच्या कागदाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:21 AM