परभणी : दोन वर्षांपासून घरफोडी, चोरी, दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपी असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, या आरोपींनी जिल्ह्यातील २३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपींकडून ८ तोळे सोने, ४४ तोळे चांदी आणि नगदी असा ७ लाख ३० हजार रुपयांचा मु्द्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.
पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी १८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ते म्हणाले, मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोडी, चोरी, दरोड्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने अट्टल चोरटे असलेल्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. अतिशय सूक्ष्म तपास करून हे यश मिळविले.
पालम तालुक्यातील बनवस येथे १२ जुलै रोजी झालेल्या चोरीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्यासह पथकाची स्थापना करण्यात आली. हे पथक माहिती घेत असताना १७ जुलै रोजी परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानात पाल ठोकून राहणाऱ्या सुरेश उर्फ गुप्ता जगदीश उर्फ शंकर शिंदे (रा. करमतांडा, ता. सोनपेठ) यास अटक करून त्याच्याकडून ११ तोळे सोने व नगदी रक्कम असा ६ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या आरोपीचे साथीदार असलेल्या इतर दोन आरोपींना १४ सप्टेंबर रोजी परळी तालुक्यातील पांगरी येथून ताब्यात घेतले. अंबू उर्फ शिवराज जगदीश उर्फ शिंदे व एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे. या दोन आरोपींनी इतर आरोपींच्या मदतीने दैठणा, पिंपळदरी, पूर्णा, सोनपेठ, गंगाखेड, पालम आदी ठिकाणी २३ घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे, असे पोलीस अधीक्षक मीना यांनी सांगितले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पालम पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल बाहत्तरे, स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, उपनिरीक्षक साईनाथ पुयड, संतोष सिरसेवाड, सहायक उपनिरीक्षक हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तूपसुंदरे, सुग्रीव केंद्रे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर, दिलावर पठाण, शेख अजहर, किशोर चव्हाण, हरी खुपसे, सय्यद मोबीन, गौस पठाण, संतोष सानप, शेख रफीक, पिराजी निळे, संजय घुगे आदींनी केली.
आणखी एका टोळीचा तपास सुरू