ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 18 - समशेर खान या तरुणाचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. याप्रकरणी प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्याचे कुटुंबीय बेमुदत उपोषणाला बसले होते. यावेळी कुटुंबातील एका सदस्याने बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
समशेर खानचा 25 डिसेंबर रोजी पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक एम.ए. रौफ यांच्यासह एकूण तीन जणांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत सुरू आहे. मात्र या प्रकरणी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी समशेरचे कुटुंबीय गेल्या पाच दिवसांपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
मंगळवारपासून उपोषणकर्त्यांपैकी समशेरचे वडील शमीर खान (वय वर्ष 56) व त्याचा भाऊ अरबाज खानची (वय 12 वर्ष) प्रकृती खालावली होती. बुधवारी प्रकृती आणखी खालावल्याने उपचारासाठी पोलिसांनी त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. शमीर खान यांना दवाखान्यात नेण्याचा आग्रह पोलिस करीत होते. याचवेळी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले.
त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ झाली. चार पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना घट्ट पकडले व रुग्णवाहिकेत जबरदस्तीने बसवले. त्यानंतर शमीर खान यांच्या कुटुंबातील आणखी तिघांनाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपोषणकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता. बघ्यांची गर्दीही जमली होती. परंतु पोलिसांनी बघ्यांना पांगविले.