परभणी : स्वत:च्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पित्याला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा परभणी येथील जिल्हा न्यायालयाने बुधवारी सुनावली.
यासंदर्भात पीडित मुलीच्या आईने परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ९ जून २०१९ रोजी फिर्यादी महिलेची मुलगी तिच्या वडिलांसोबत घरात लुडो खेळत होती. याच वेळी घरातून मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून फिर्यादी महिला घरात पळत गेली. त्यावेळी पित्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे पीडित मुलीने सांगितले. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव यांनी तपास केला. त्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
पोक्सो न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकार पक्षातर्फे प्रमुख सरकारी वकील ॲड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली. सुनावणीअंती न्या. एस. आय. पठाण यांनी आरोपीस कलम ६ पोक्सो अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंड, कलम १० पोक्सो अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये १ हजार रुपये दंड आणि कलम ५०६ अन्वये १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात प्रमुख सरकारी वकील ॲड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील ॲड. अभिलाषा पाचपोर यांनी बाजू मांडली. तसेच पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, कर्मचारी सुरेश सुरनर, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.