लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ४२ वाळू घाटांपैकी पहिल्या फेरीमध्ये १० घाटांचे लिलाव पूर्ण झाले असून, प्रशासनाच्या गंगाजळीत ८ कोटी ९५ लाख ३९ हजार २५८ रुपयांचा महसूल जमा झाला आहे़गोदावरी, पूर्णा आणि दूधना नदी काठावरील वाळू घाटांचे लिलाव करून प्रशासन वाळू उपस्याला परवानगी देते़ दरवर्षी या लिलावामधून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो़ यावर्षी देखील वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे़ परभणी जिल्ह्यातील ४२ आणि परभणी व हिंगोली जिल्ह्यातील संयुक्त ५ अशा ४७ वाळू घाटांच्या लिलावासाठी प्रशासनाने ठेकेदारांकडून निविदा मागविल्या होत्या़ प्राप्त झालेल्या निविदांचा लिलाव २१ डिसेंबर रोजी करण्यात आला़ या लिलावामध्ये १० वाळू घाट विक्री करण्यात आले आहेत़ सरकारी किंमतीपेक्षा अधिक किंमत प्राप्त झाल्याने प्रशासनाने वाळू घाटांचा लिलाव पूर्ण केला़ त्यामुळे प्रशासनाला वाळू घाटांच्या लिलावामधून ९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ वाळू घाटांचा लिलाव न झाल्यास वाळु चोरीची शक्यता वाढते़ त्यातून महसूल प्रशासनाला नुकसानीला सामोरे जावे लागते़ त्यामुळे दरवर्षी नदी काठावरील वाळू घाटांचे लिलाव करून नदीपात्रातील वाळू विक्री करून महसूल मिळविला जातो़गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लिलावातील वाळू घाटांची संख्या कमी झाली आहे़ मागील वर्षी ६५ वाळू घाटांचे लिलाव झाले होते़ त्या तुलनेत यावर्षी केवळ ४७ वाळू घाट लिलावात ठेवले आहेत़ त्यापैकी १० वाळू घाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे़ आता वाळू लिलावाची दुसरी फेरी सुरू झाली आहे़ या फेरीमध्ये ४ जानेवारी रोजी लिलाव केला जाणार आहे़जानेवारीत दुसरी फेरी४ जानेवारी रोजी वाळू घाटांच्या लिलावाची दुसरी फेरी होणार आहे़ यात परभणी जिल्ह्यातील ३४ आणि परभणी-हिंगोली जिल्ह्यातील ४ संयुक्त घाटांचा समावेश आहे़ या वाळू घाटांच्या लिलावामधून ४ ते ५ कोटी रुपयांचा महसूल जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ मागील वर्षी लिलावाच्या पहिल्या फेरीत ९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता़ यावर्षी देखील जवळपास एवढीच रक्कम प्रशासनाला प्राप्त झाली आहे़ जिल्हा प्रशासनाला यावर्षी ४२ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, मार्च अखेरपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे़गोपेगाव, मोहळाला सर्वाधिक किंमतवाळू घाटांच्या झालेल्या लिलावांपैकी पाथरी तालुक्यातील गोपेगाव आणि सोनपेठ तालुक्यातील मोहळा या दोन वाळू घाटांनी सर्वाधिक किंमत दिली आहे़ जिल्हा प्रशासनाने दोन्ही वाळू घाटांसाठी ५४ लाख १७ हजार १९ रुपये ही सरकारी किंमत निश्चित केली होती़ २१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत गोपेगावचा घाट १ कोटी ८४ लाख ७८ हजार २७० रुपयांना विक्री झाला आहे़ तर त्या खालोखाल सोनपेठ तालुक्यातील मोहळा येथील वाळू घाट १ कोटी ५१ लाख रुपयांना विक्री झाल्याची माहिती मिळाली़
परभणी जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:45 AM