खाजगी प्रवासी लक्झरी बस हिंगोली - पुणे दररोज प्रवासी घेऊन ने -आण करीत होती. लक्झरी बस (क्रं एम.एच.२० डी.डी.०५२९) ही पुणे येथून हिंगोलीकडे जात असताना चारठाणा ते जिंतूर रस्त्यावर काम सुरू असल्याने या लक्झरी बसची गती कमी होती. ८ जानेवारी रोजी पहाटे ६:१५ वाजेच्या सुमाराला मानकेश्वर पाटीवर एका नागरिकाने बसचालकास लक्झरी बसच्या इंजीनने पेट घेतल्याचा हाताद्वारे इशारा केला. त्यानंतर चालक शौकत याने प्रसंगावधान राखत बस थांबवून लक्झरी बसमधील बसलेल्या १५ प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. विशेषतः. काही प्रवासी हे सकाळी गाढ झोपेत होते. एकच गोंधळ झाल्याने प्रवासी भांबावून गेल्याने सोबतचे साहित्य न घेता प्रवाशांनी बसबाहेर पडण्याची घाई केली. क्षणात बस ने पेट घेतला. जीवितहानी टळली असली तरी बस पूर्णतः जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच प्रवाशांचे सोबतचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक बळवंत जमादार,उपनिरीक्षक प्रदीप आलापूरकर, पोलीस कर्मचारी बळीराम ईघारे,आचार्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिंतूर अग्निशमन दलाशी संपर्क करून अग्निशमन बंबाने ही आग विझवली. परंतु, बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.
औरंगाबाद- जिंतूर महामार्गावर लक्झरी बस पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:13 AM