औंढा नागनाथ ( हिंगोली ) : पूर्णा नदीचे पाणी औरंगाबाद-नांदेड रस्त्यावरुन वाहत असल्याने हा मार्ग दुपारी १२ वाजेपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या मार्गावर पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी हजर झाले आहेत. रस्त्याचा दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
तालुक्यातील सिद्धेश्वर धरणात खडकपूर्ण धरणाचे पाणी एलदरी धरणात व त्यातील पाणी सिद्धेश्वर धरणात सोडले जात आहे. त्यामुळे धरणाचे 12 गेट 10 फुटाने उघडून एक लाख क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे . नदीपात्रा दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील 28 गावांना तहसीलदार कृष्णा कणगुले यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. नदीचे पाणी औरंगाबाद-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरून १ फुट उंचीने वाहत आहे. या मार्गावरून वाहतूक मोठी असल्याने तहसीलदार कणगुले यांनी रस्ता बंद करण्याचा सूचना पोलीस विभागाला दिल्या. या ठिकाणी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे , सहायक पोलिस निरीक्षक मुंजाजी वाघमारे, नायब तहसीलदार सचिन जोशी, वैजनाथ भालेराव असे महसूल व पोलिसांचे पथक तैनात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.