परभणी : तालुक्यातील तरोडा ते राज्य महामार्ग २४८ या रस्त्याच्या दयनीय अवस्थेचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गावातील सर्व ऑटो जिल्हा परिषदेत आणून घोषणाबाजी केली.
तरोडा गावचा रस्ता मागील २५ वर्षांपासून झालेला नाही. यातच ११ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीने या गावाला जोडणारा पूल वाहून गेला. यामुळे ग्रामस्थांना आजारी व्यक्तीस शहरात नेण्यासाठी खाटेवर टाकून प्रवास करावा लागत आहे. तरोडा ते राज्य महामार्ग २४८ या ५ कि. मी. रस्त्यावर पावसाने चिखल झाला आहे. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी तसेच पूल उभारणीसाठी ग्रामस्थांनी गावातील सर्व ऑटो परभणीच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयापर्यंत आणले. या ठिकाणी घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी किशोर ढगे, गजानन तुरे, शेख जाफर, मुंजाभाऊ लोंढे, रामभाऊ खवले, विकास भोपाळे, गजानन दुगाणे, राजेश बानमारे यांची उपस्थिती होती.