कोरोनाच्या संसर्गानंतर मोठ्या प्रमाणात मतदार असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिल्ह्यात शुक्रवारी पार पडल्या. ग्रामीण भागातील महत्वपूर्ण निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. मतदारांनीही या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंंदविला आहे. सकाळी ७,३० वाजेपासूनच मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. पहिल्या टप्प्यापासून मतदानाचा वेग अधिक होता. महिला आणि पुरुष मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले. सकाळी ११.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात २ लाख १०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ५३.२८ टक्के मतदान झाले. या काळात १ लाख ७२ हजार ८१३ पुरुष आणि १ लाख ८५ हजार ४३३ महिला मतदारांनी मतदान केले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हीच टक्केवारी ६९.६८ वर पोहचली. ९ तालुक्यांमधील ४ लाख ६८ हजार ५३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात २ लाख ३० हजार ५६५ महिला आणि २ लाख ३७ हजार ९६८ पुरुष मतदारांचा समावेश होता. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. या काळात अनेक भागात मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सायंकाळी ४ वाजेनंतरही मतदान केंद्रावर गर्दी पहावयास मिळाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत साधारणत: ८० टक्क्यापर्यंत मतदान पोहचल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मानवत तालुक्यामध्ये ४१ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. एकाही गावात अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील ९६ हजार ७८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तालुक्यात ८२.५१ टक्के मतदान झाल्याची माहिती तहसीलदरा डी.डी.फुफाटे यांनी दिली. सेलू तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीसाठी ७८ टक्के तर गंगाखेड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतीसाठी ८२ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सोनपेठ तालुक्यातही ८२.५१ टक्के मतदान झाले आहे. या तालुक्यात २५ हजार ५०८ महिला आणि २७ हजार ५४९ पुरुष अशा ५३ हजार ५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
फिजिकल डिस्टन्सने रांगा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर फिजिकल डिस्टन्स ठेवत मतदारांच्या रांगा लावण्यात आल्या. तसेच मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. अनेक मतदान केंद्रावर मतदारांची शारीरिक तापमानाची तपासणी करुन त्यांना मतदान केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला. एकंदर कोरोनाचा संसर्ग पसरु नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली होती.