लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीलोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित असलेल्या १७ उमेदवारांचे सरासरी वय ४५ वर्षे असून, ६६ वर्षांचे सर्वाधिक वयाचे तर २७ वर्षे सर्वात कमी वयाचे उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरले आहेत़लोकसभेचे सभागृह हे देशातील सर्वाेच्च सभागृह असल्याने या सभागृहात वयाने ज्येष्ठ असलेल्या व्यक्तींनीच मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करावे, असा काहीसा पुर्वी सर्वसामान्यांमध्ये समज होता़ त्यामुळे वयाची ५० शी झालेल्या नेत्यांकडूनच लोकसभेच्या निवडणुका लढविल्या जायच्या; परंतु, हळूहळू राजकीय मतप्रवाहामध्ये बदल होत गेले आणि वयाने ज्येष्ठ असलेल्यांनीच लोकसभेची निवडणूक लढवावी हा समज मागे पडला़ आता पंचविशीतील तरुण मंडळीही लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरू लागली आहे़ त्या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित असलेल्या १७ उमेदवारांच्या वयाचा आढावा घेतला असता, सरासरी ४५ वर्षे वयाचे उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याचे दिसून येत आहे़ १७ उमेदवारांमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार उत्तमराव पांडुरंगराव राठोड हे सर्वात ज्येष्ठ असून त्यांचे वय ६६ वर्षे आहे़तर भारतीय प्रजासुराज्य पक्षाचे उमेदवार किशोर नामदेव गवारे हे यादीतील सर्वात कमी म्हणजेच २७ वर्षाचे उमेदवार आहेत़ शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खा़ संजय जाधव हे ५२ वर्षांच असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर हे ३९ वर्षांचे आहेत़ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान हे ३७ वर्षाचे आहेत़ तर कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे राजन क्षीरसागर हे ५२ वर्षांचे आहेत़ २७ उमेदवारांमध्ये एकमेव महिला असलेल्या संगीता निर्मळ यांचे वय ४२ वर्षे आहे़पीएच़डी़ प्राप्त अन् चौथी पासही उमेदवारलोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या १७ उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती घेतली असता, त्यामध्ये बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ़ वैजनाथ सिताराम फड हे एम़एस्सी अॅग्री, पीएच़डी़ धारक आहेत तर अपक्ष उमेदवार संगीता निर्मळ या फक्त चौथी पास आहेत़ शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव हे बारावी नापास असून, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर व कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार राजन क्षीरसागर हे बी़एसस्सी उत्तीर्ण आहेत़ वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर खान बी़ कॉम. पास आहेत़ स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार डॉ़ आप्पासाहेब कदम हे डी़एच़एम़एच़ पास असून, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार उत्तमराव राठोड हे बी़ए़, बीएड् उत्तीर्ण आहेत़ भारतीय प्रजासुराज्य पक्षाचे उमेदवार किशोर गवारे व किशोर बाबूराव मुन्नेमाणिक हे उमेदवार बारावी पास असून, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार यशवंत कसबे हे एल़एल़बी़ उत्तीर्ण आहेत़ बहुजन महापार्टीचे उमेदवार शेख सलीम शेख इब्राहिम हे पाचवी पास असून, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे उमेदवार सुभाष अंबोरे हे बी़एस्सी उत्तीर्ण आहेत़ भारतीय बहुजन क्रांती दलचे उमेदवार संतोष राठोड, संघर्ष सेनेचे उमेदवार हरिश्चंद्र पाटील, अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे हे बी़ए़ उत्तीर्ण आहेत़ अपक्ष उमेदवार गोविंद देशमुख हे दहावी पास आहेत़
परभणीतील उमेदवारांचे सरासरी वय ४५ वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:13 AM