यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस झाला. जून आणि जुलै या महिन्यांत ७५ टक्के पाऊस बरसला आहे. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती. तब्बल २० दिवसांचा खंड दिला. त्यामुळे पिके सुकत होती. शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते. मात्र, मागील आठवड्यापासून पाऊस होत आहे. दोन दिवसांपूर्वीच पाथरी तालुक्यातील दोन आणि पालम तालुक्यातील तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाचा असमतोलपणा दिसून आला. पाथरी, पालम आणि सोनपेठ या तीन तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. पाथरी तालुक्यात ११४ टक्के, पालम १०४ टक्के आणि सोनपेठमध्ये १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मानवत तालुक्यात आतापर्यंत ९९ टक्के पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात ८७, गंगाखेड ८८, जिंतूर ९६, पूर्णा ८८ आणि सेलू तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९६ टक्के पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७६१ मिमी पाऊस होतो. आतापर्यंत ७२२ मिमी म्हणजे वार्षिक सरासरीच्या ९४ टक्के पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्येच वार्षिक सरासरी गाठली जात असल्याने खरीप हंगामातील पिके बहरात आहेत. प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस मिमीमध्ये
परभणी ७०६
गंगाखेड ६४०
पाथरी ८४८
जिंतूर ७०४
पूर्णा ७१३
पालम ७९४
सेलू ७११
सोनपेठ ७०८
मानवत ७२६