सद्य:स्थितीला कापूस पिकाच्या वेचण्या संपल्या असून, काही भागांत हे पीक शेतात तसेच उभे आहे. कीड नियंत्रणाच्या पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याने सेंद्री बोंडअळीचा प्रादुर्भाव पुन्हा पुन्हा वाढत आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर किडीला नियमित खाद्यपुरवठा होऊन या किडीचा जीवनक्रम अखंडितपणे सुरू राहील. त्यामुळे पुढील खरीप हंगामातही या किडीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते. तेव्हा शेतकऱ्यांनी वेचणी झाल्यानंतर कापसाचे पीक काढून टाकावे. पऱ्हाट्यांमध्ये बोंडअळीच्या सुप्त अवस्था असतात. त्यामुळे या पऱ्हाट्या शेताजवळ रचून ठेवू नयेत. कपाशीचे फरदड घेणे टाळावे, शेतातील पऱ्हाट्या वेचून नष्ट कराव्यात व शेत स्वच्छ ठेवावे, रोटाव्हेटरऐवजी पऱ्हाटी चुरा करणारे यंत्र वापरून पऱ्हाटीचा उपयोग कम्पोस्ट खतासाठी करावा. डिसेंबर महिन्यानंतर पाच ते सहा महिने शेत कापूस पीकविरहित ठेवल्यास बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात येतो. त्यामुळे फरदड कापूस घेऊ नये, असे आवाहन मस्के यांनी केले.
बोंडअळी नियंत्रणासाठी फरदड कापूस टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:52 AM