परभणी: खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असली तरी अद्यापपर्यंत केवळ १६ टक्के शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे हे पीक कर्ज जलद गतीने वाटप करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने १८ जून रोजी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने १२१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे; मात्र बँकांकडून पीक कर्ज वाटप करताना टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत बँकांनी पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अन्यथा भाजपच्या वतीने पीक कर्जासाठी जोगवा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, बाळासाहेब भालेराव, बाळासाहेब जाधव, माधव चव्हाण, बाबासाहेब जामगे, अरुण गवळी, मोहन लोहट, प्रभाकर शिंदे, आकाश लोहट, शिवाजी शेळके, कृष्णा सोळंके, दिलीप काळदाते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.