सिंचन विहिरीच्या कामांकडे फिरवली पाठ
पालम : तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक सिंचन विहिरीची कामे सुरू करण्यात आली आहेत; मात्र वेळेवर मजुरांना मजुरी व बांधकाम केलेले कुशल देयक मिळत नसल्याने या कामाकडे ग्रामपंचायतींनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायम राहणार आहे.
निम्न दुधना कालव्याची दुरवस्था
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कालव्याला जागोजागी तडे गेले आहेत. याशिवाय अनेक भागात कालव्याच्या फरशा उखडल्या आहेत. ज्या उद्देशाने कालव्याची उभारणी झाली, त्या उद्देशालाच बगल दिली जात आहे.
जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले
परभणी : जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आठवडाभरात अपघातांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. या अपघातांमध्ये वाहनधारकांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव बँकेत पडून
परभणी : सुशिक्षीत बेरोजगारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या विविध आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत कर्ज वाटप करण्यास बँका नकारघंटा लावत असल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
११४ ट्रॅक्टरचे वाटप
परभणी: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यात येतात. २०१७ ते २०२० या तीन वर्षात जिल्ह्यातील ११४ लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये २०१७-१८ मध्ये ५०, २०१८-१९ मध्ये २४ तर २०१९-२० मध्ये ४० लाभार्थ्यांचा समावेश आहे. ही योजना सामाजिक न्याय व विशेष विभागाकडून राबवली जाते.
फळ लागवडीसाठी २१०० हेक्टर प्रस्तावित
परभणी: २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना व पोखरा योजनेअंतर्गत २ हजार १०० हेक्टरवर फळ लागवड करण्याचे प्रस्तावित केले आहे. यावर्षी गतवर्षीपेक्षा ६०० हेक्टर ने फळ लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.
जिंतूर-परभणी महामार्ग कामाला गती
परभणी : जिंतूर-परभणी या महामार्गावर मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र मागील दीड वर्षांपासून कामाला गती मिळत नसल्याने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत होती. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने परभणी ते टाकळी कुंभकर्ण दरम्यानच्या रस्त्याचे काम गतीने सुरू आहे.
निधी मंजूर होवूनही होईना रस्त्याचे काम
परभणी : तालुक्यातील आर्वी ते कुंभारी बाजार या ५ किमी रस्त्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून जवळपास १५ लाख रुपयांचा निधी मंजुर झालेला आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून निधी मंजूर होवूनही या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध वार्डमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
पूर्णा शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
पूर्णा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
मानवत शहरात वाहतुकीची कोंडी
मानवत : शहरातील बहुतांश रस्ते हे अरुंद झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातील वाहनधारक आपली वाहने या रस्त्यावरच उभी करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना त्रास होत आहे.