परभणी : शहरवासीयांच्या विविध समस्यांवर जागरूक नागरिक आघाडीने १७ ऑगस्ट रोजी येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. सिग्नल, पथदिवे यासह शहरातील विविध प्रश्न या आंदोलनातून मांडण्यात आले.
शहरवासीयांच्या प्रश्नावर जागरूक नागरिक आघाडी स्थापन करण्यात आली आहे. विविध प्रश्नांना घेऊन नागरिक आघाडी आंदोलन करीत आहे. मंगळवारी शहरातील रस्ते, वीज, पाणी यांसह इतर अनेक समस्या घेऊन जागरूक नागरिक आघाडीने आंदोलन केले. या समस्या तत्काळ मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आघाडीच्या ॲड. माधुरी क्षीरसागर, सुभाष बाकळे, संतोष आसेगावकर, ॲड. लक्ष्मण काळे, प्रभावती अन्नापुरे यांच्यासह नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
काय आहेत मागण्या
महात्मा फुले पुतळ्याजवळील चौकाचे सुशोभिकरण करावे व तेथे हायमास्ट लाइट बसवावा, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत या ठिकाणी वाहनांची गर्दी होत आहे तेथे सिग्नल व्यवस्था सुरू करावी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सिग्नल व्यवस्था सुरू करावी, भारतनगर विसावा कॉर्नर ते दत्तधामपर्यंत तसेच जाळीचा महादेव ते गंगाखेडरोड या मार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू करावी, अंत्यसंस्कारासाठी गॅस वाहिनीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे त्याची अंमलबजावणी करावी, स्ट्रीट लाइटचे कंत्राट ज्या एजन्सीला महापालिकेने दिले आहे, त्यांना सर्व स्ट्रीट लाइट सुरू करण्याचे आदेश द्यावेत, शिवाजी पार्कातील नाना-नानी पार्क उद्यानाच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी पाच वर्षांपूर्वी मंजूर झाला होता, अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. तेव्हा या कामाची चौकशी करावी व कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.