परभणी : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी परभणीत शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेत एका कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी महिला, मुलींचे रक्षण आणि सन्मानाच्या अनुषंगाने धर्मरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान संघ आणि भाजपचे पदाधिकाऱ्यांनी अंतर ठेवले किंवा ते सुद्धा त्यांच्यापर्यंत गेले नाही. मात्र, दुसरीकडे ताेगडिया यांनी उद्धव ठाकरे गटाच्या खासदार, आमदारांच्या घरी भेट देत राजकीय गुगली टाकल्याचे पुढे आले.
गेल्या काही दिवसांपासून प्रवीण ताेगडिया केंद्र सरकारच्या ध्येय-धोरणांवर टीका करत आहे. त्यामुळे संघ, भाजप आणि तोगडिया यांच्यात अंतर वाढले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकेकाळी एकमेकांच्या सोबत ध्येय-धोरण ठरवणारे ताेगडिया आणि भाजप यांच्यात दरी पडल्याची सध्य:स्थिती आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमास संघ आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहत नसल्याची स्थिती आहे, ती परभणीत सुद्धा दिसून आली. याउलट महाराष्ट्रातील सत्ता संघर्षांत शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे गट पडले. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्याची सूत्रे हाती घेत महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. त्यातच प्रवीण तोगडिया गुरुवारी परभणीत आले असता त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
सुरक्षा, रोजगार हवादेशभरात महिला, मुलींवर अन्याय, अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. यात हिंदू धर्मावर अनेक संकटे येत असून त्यांच्या रक्षणासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन तोगडिया यांनी शहरात झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत केले. यासह युवक, युवतींना अपेक्षित शिक्षण, सुरक्षा आणि रोजगार देण्याची जबाबदारी सरकारची आहे. परंतु, ते सध्या कमी पडत असल्याची टीका त्यांनी केले.
कट्यार वाटपास परवानगी नाकारलीनांदखेडा रोडवरील मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिला, मुलींना आत्मसुरक्षेच्या अनुषंगाने कट्यार वाटपाचा कार्यक्रम नियोजित होता. परंतु, पोलीस प्रशासनाने त्यास परवानगी नाकारल्याने तोगडिया यांनी पोलिस यंत्रणेवर आक्षेप नोंदवला. देशभरात आम्ही कट्यारचे वाटप केले. परंतु, परभणीत पोलिस चुकीची भूमिका घेतल्याची टीका तोगडिया यांनी केली.