परभणी : लाकडाचे सरण करून एका व्यक्तीस त्याच्या घरातच जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील अब्दुल रहीमनगर भागात १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
जाकेर अहेमद खुर्शिद अहेमद देशमुख (४८) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेच्या संदर्भात मयताचे भाऊ जुबेर अहेमद खुर्शिद अहेमद देशमुख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. येथील अब्दुल रहीमनगर भागात जाकेर अहमद खुर्शिद अहेमद देशमुख यांचे निवासस्थान आहे. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करून लाकडाचे सरण रचून त्यास कोणत्या तरी ज्वलनशील पदार्थाने रात्रीच्या वेळी जाळून ठार मारले. मृतदेहाचा वास सुटू नये म्हणून मिठाचा वापर करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार, रामेश्वर तुरनर, पोलीस उपनिरीक्षक जमील जहांगीरदार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर तुरनर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
घटनेचे कारण अस्पष्टदरम्यान, ही घटना कोणत्या कारणाने घडली, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, त्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.