परभणी : कविवर्य बी. रघुनाथ यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान अतिशय महत्त्वाचे असून, प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तृत्व त्यांनी सिद्ध केले आहे म्हणूनच बी.रघुनाथ हे केवळ परभणीचेच नव्हे तर मराठी मातीचे वैभव आहेत, असे प्रतिपादन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
थोर साहित्यीक कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त महानगर पालिकेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी म.न.पा. आयुक्त देविदास पवार, पत्रकार आसाराम लोमटे, मसापचे रमाकांत कुलकर्णी, सरोजताई देशपांडे, प्रा. अशोक जोंधळे, उदय वाईकर, नागेश कुलकर्णी, दिनकर देशपांडे, अरुण चव्हाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. भालेराव म्हणाले, बी. रघुनाथ यांचा स्मृती दिनानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रम घेतला जातो, ही अभिनंदनीय बाब आहे. आयुक्त देविदास पवार यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांनी नवीन वाचकांना व संशोधकांना निजामकालीन मराठवाडा व त्या काळच्या लेखाजोखा अभ्यासण्यासाठी बी. रघुनाथांचे साहित्य फार मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे, असे प्रतिपादन केले. प्रा. अशोक जोंधळे यांनी ‘सांज’ ह्या कवितेचे भावपूर्ण सादरीकरण केले. उदय वाईकर यांनी ‘आज कुणाला गावे’ ही कविता सादर केली. तर ‘निळावंतीची लावणी’ ह्या कथेचे नागेश कुलकर्णी यांनी नाट्यअभिवाचन केले. तसेच "ते न तिने कधी ओळखले" कविता दिनकर देशपांडे यांनी सादर केली. बालराज्यनाट्य स्पर्धेतील गुणी कलाकार कु.श्रीया लव्हेकर हिचा सत्कार करण्यात आला. राजकुमार जाधव यांनी उपस्थित साहित्यिकांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी प्रमोद बल्लाळ, संजय पांडे, रामेश्वर कुलकर्णी, किशन पैके, कैलास काकडे, भगवान पावडे, नगरसचिव विकास रत्नपारखी व युवराज साबळे आदींनी प्रयत्न केले.
पुष्पा बनसोडे व ईखतियार पठाण यांनी सूत्रसंचालन केले.