सोनपेठ (परभणी): सोनपेठ शहरातील दहिखेड येथील पोळा मानपानच्या मुद्द्यावरुन बंद होता. साठ वर्षानंतर सहमतीने यंदा हा पोळा फुटल्याने गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा केला. सोनपेठ शहरातील दहिखेड येथील महारुद्र मारोती मंदीराला मानाचे बैल मिरवण्यावरुन साठ वर्षापुर्वी वाद होऊन पोळा सण बंद पडला होता.
शेतकरी आपले बैल घेऊन सोनपेठ शहरातील मारोती मंदीराला बैल मिरवुण पोळा साजरा करत. हा बैल पोळा पुर्ववत साजरा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. या वर्षी दहिखेड येथील नागरिकांनी पोळा सण साजरा करण्यासाठी बैठक घेऊन मानपानाचे विषय संपवुन पोळा सण साजरा करण्याची सामंजस्याची भूमिका घेतली.
या साठी सोनपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी पुढाकार घेऊन नागरीकांना विश्वासात घेतले व परंपरे नुसार देशमुख कुटुंबीयांचा मान कायम ठेवत बैल मिरवण्यासाठी परवानगी दिली.दहिखेड येथील नागरीकांनी यास मान्यता देऊन देशमुख कुटुंबीयांचां मान त्यांना देऊन त्यांचा सन्मान करुन पोळा सण साजरा करण्याची तयारी प्रशासनाला दर्शविली .त्या प्रमाणे दि.२६ रोजी सोनपेठ येथील दहिखेड मारोती मंदीराच्या प्रांगणात ६० वर्षानंतर वाजत गाजत बैल मिरवण्यात आले.
या वेळी गावकऱ्यांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व रविंद्र देशमुख,रणजित देशमुख,विश्वजित देशमुख,संतोष देशमुख,जयराज देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. हा बैल पोळा साजरा करण्यात यावा यासाठी रुख्माजी मस्के,माजी नगर सेवक मारोती रंजवे, शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदु,रामभाऊ नवले,नारायण मस्के,भगवान मस्के, राम भंडारे बालाजी कुंभार यांच्या सह दहिखेड येथील गावकऱ्यांनी परीश्रम घेतले. या वेळी पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी पोलीस बांधव व गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त बजावला.