परभणी: येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बालासाहेब रामराव देसाई यांना संभाजीनगर येथील विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी १९ मे रोजी काढलेल्या एका आदेशान्वये संचालक पदावरून अपात्र ठरविले आहे.
प्राथमिक कृषी पत पुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संयुक्त शेती व धान्य अधिकोष सहकारी संस्था ता. पूर्णा या मतदारसंघामधून संचालक म्हणून बालासाहेब रामराव देसाई हे निवडून आले होते. त्यांची विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. रेगांव या संस्थेच्या रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेवरती १० ऑक्टोबर २०२२ रोजी निवड करण्यात आली. परंतु या निवडीविरुद्ध विविध कार्यकारी सेवा सोसायटी धानोरा मोत्या ब चे चेअरमन पांडुरंग लक्ष्मण डाकोरे यांनी आक्षेप घेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांच्याकडे तक्रार केली.
या तक्रारीमध्ये विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. रेगांव ता. पूर्णा या संस्थेकडे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. या बँकेची थकबाकी आहे. त्यामुळे बालासाहेब रामराव देसाई यांचे संचालक पद रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत बालासाहेब रामराव देसाई यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी बँकेचे संचालक म्हणून अपात्र करण्यात येऊन त्यांचे संचालक मंडळ सदस्यत्व बंद करण्यात येत आहे. त्यांची जागा रिक्त असल्याचे मानण्यात येत आहे, असे आदेश काढले. या आदेशाने बालासाहेब देसाई यांचे संचालक पद रद्द झाले आहे.