परभणी : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असला तरी या पावसामुळे जवळपास २४ हजार १८८ हेक्टर जमिनीवरील मुगाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काढणीला आलेल्या शेंगाना कोंब फुटले आहेत. अनेक ठिकाणी पिकात पाणी थांबल्याने ही पिके पिवळी पडू लागली आहेत.
जिल्ह्यात मृग नक्षत्रापासून चांगला पाऊस पडत आहे. आतापर्यंत ५११.५० मि.मी.पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये ४५० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असली तरी सततच्या पावसामुळे पिकांच्या नुकसानीत भर पडू लागली आहे. जिल्ह्यात २४ हजार १८८ हेक्टर जमिनीवर मुगाचा पेरा करण्यात आला होता. हा मूग काढणीला आला असताना पावसाची झड गेल्या १० दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांना काढता येत नाही. परिणामी जमिनीवर पडून हे पीक सडू लागले आहे. तसेच मुगाच्या शेंगाना कोंब फुटत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावला जात आहे. परिणामी कोरोनाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळीराजाच्या अडचणीत वाढ होत आहे.
गंगाखेडमध्ये कापसाची पानगळगंगाखेड तालुक्यात खरीप हंगामाची पिके जोमात आहेत. सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर दुबार पेरणी करण्यात आली. हे पिकही आता चांगले आले आहे. असे असताना सातत्याने पाऊस पडत असल्याने या पिकाचे नुकसान होते की काय? याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तसेच सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर मावा अळी, चक्री भुंगा, उंट अळी, खोडमाशी आदीचा तर फुले व बोंडे लागत असताना कापसावर गुलाबी बोंड अळी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे फूल व पाळगळ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोनपेठमध्ये उत्पादनावर परिणामतालुक्यात गेल्या ८ दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे काढणीला आलेल्या मुगाच्या शेंगाना मोड फुटत आहेत. त्यामुळे शेतीतील पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तालुक्यात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके प्रारंभीच्या पावसाने जोमात आली आहेत. तर मूग काढणीला आला आहे. असे असताना गेल्या आठ दिवसांपासून पावसाची झड कायम आहे. त्यामुळे मुगाच्या शेंगांना मोड फुटले आहेत. तसेच अति पावसामुळे पिकेही पिवळी पडू लागली आहेत.
मानवतमध्ये मुगाव्यतिरिक्त अन्य पिके जोमाततालुक्यात अतिवृष्टीमुळे मुगाच्या पिकाचे नुकसान झाले असले तरी अन्य पिकांची स्थिती मात्र चांगली आहे. तालुक्यात ४३ हजार ९७ हेक्टर जमिनीवर खरिपाची पेरणी झाली असून त्यामध्ये २० हजार ६३५ हेक्टरवर कापूस तर १५ हजार ७७३ हेक्टर पिकावर सोयाबीनची पेरणी केली आहे. २ हजार ३५७ हेक्टरवर मुगाची लागवड केली असून हेच पीक अतिवृष्टीने नुकसानीत आले आहे. तसेच २ हजार ७०० हेक्टरवर तूर तर २८९ हेक्टरवर उडदाची लागवड केली आहे. मुगाच्या शेंगा तोडायला आल्या असतानाच पाऊस येत असल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
हिवरखेड्यात पिके पाण्याखालीहिवरखेडा/येलदरी/ बोरी: जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा व येलदरी शिवारात गेल्या ८ दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अशातच येलदरी धरण १०० टक्के भरल्याने धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. त्यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. परिणामी या भागातील शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पिकात पाणी असल्याने पिकांची वाढही खुंटली आहे. त्यामुळे खरिप हंगामातच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो की काय? अशी चिंता सतावू लागली आहे. दरम्यान, बोरी व परिसरातील कोक, निवळी, माक, शेक, दुधगाव, देवगाव शिवारातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
पालममध्ये नुकसान तालुक्यात १ हजार ६०० हेक्टर जमिनीवर मुगाची पेरणी करण्यात आली असून अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महसूल विभागाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत.
सेलूत तहसीलदारांचे पंचनाम्याचे आदेशतालुक्यातील चार गावांमधील ७ शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने पंचनामे करण्याची मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. रवळगाव येथील रमेश सरोदे, डिगंबर सरोदे, चिकलठाणा बु. येथील एकनाथ घांडगे, बाळासाहेब जाधव, इंदुमती पांचाळ, ब्रह्मणगाव येथील मधुकर नजान, धनेगाव येथील प्रमोद जीवणे या शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीत पाणी साचले आहे. तसेच पाण्यामुळे धुरे फुटले आहेत. पिकांचेही नुकसान झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तहसील कार्यालयाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु, अद्याप पंचनामे मात्र केले नाहीत.