परभणी : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस होत आहे. गुरुवारी अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली असून हा पाऊस खरीप पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गुरुवारी दिवसभर वातावरणात उकाडा होता. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास परभणी शहर आणि परिसरामध्ये पावसाला प्रारंभ झाला. शहरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या आहेत. जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि परिसरातील सावंगी म्हाळसा, मुरुमखेडा, हिवरखेडा, सावळी, घडोळी या भागाला गुरुवारी पावसाने झोडपून काढले. धुवाँधार पाऊस झाल्याने येलदरी ते इटोली या रस्त्यावर छोट्या पुलावर पाणी साचले होते. त्यामुळे दुपारी २ वाजेनंतर एक तास वाहतूक ठप्प होती. पुलावर पाणी आल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय झाली.
दरम्यान, चार दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतीकामांमध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. सेलू शहर आणि परिसरातही गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत २११.४८ मि.मी. पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या २५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक २५४ मि.मी. पाऊस झाला आहे. पालममध्ये २३५ मि.मी., मानवत २४८ मि.मी., सेलू २१३ मि.मी., पूर्णा २२७, परभणी १९२, जिंतूर १८१, सोनपेठ १७७ आणि गंगाखेडमध्ये १७४ मि.मी. पाऊस झाला आहे.