मानवत ( परभणी) : राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाच्या विरोधात रयत क्रांती शेतकरी संघटनेने आज दुपारी 2:15 वाजता तहसील कार्यालय परिसरात आक्रमक आंदोलन केला. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलकांनी हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याबाहेर ऊस नेण्यास बंदी घालणारा निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे. सहकार, पणन व वस्त्रेद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी बंदीविषयक नुकतीच अधिसुचना काढली आहे. त्यामुळे राज्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला आहे. यामुळे रयत क्रांती संघटनेने आज आक्रमक आंदोलन केले. घोषणाबाजी करत मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून निर्णयाचा निषेध नोंदवला.
तसेच राज्य सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना आंदोलकांनी दिले. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मधुकर आवचार, परमेश्वर घाटुळ, कृष्णा जाधव, राधाकिशन अवचार शिवाजी अवचार , संतोष अवचार, विशाल घाटूळ, सोपान घाटूळ चक्रधर घाटूळ, गोविंद समिंद्रे यांच्या सह्या आहेत.