- विठ्ठल भिसेपाथरी - अचानक आलेल्या प्रचंड वादळीवाऱ्याने तालुक्यातील केळी बागांच्या फडाला अक्षरशः जमीनदोस्त केले. पाथरगव्हाण ( बु ) येथील एका शेतकऱ्यांची आठ एकर बाग वाऱ्यात जमीनदोस्त झाली यात 35 लाख रुपये पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तसेच कासापुरी पाथरी भागांतील काही शेतकऱ्यांच्या केळी बागा कोलमडून पडल्या आहेत. एकंदरीत नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात गेला आहे.
पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाचा डावा कालवा आणि गोदावरी नदीच्या पात्रातील तीन बंधारे यामुळे सिंचनाची सोय आहे. बारमाही सिंचन होत असल्याने इतर पिकासोबत उस आणि केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. यावर्षी पाणी अधिक उपलब्ध असल्याने केळीचे फड जोमदार आले होते. केळीच्या बागांना सतत पाणी द्यावे लागते. बागा पाण्यात असल्याने अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका केळी बागांना बसला आहे. रविवारी 4 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तालुक्यात अचानक वादळी वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले. सगळीकडे वाऱ्याचे लोट आणि वादळी पाऊस आल्याने सर्वत्र हाहाकार माजला.
पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण ( बु) येथील मनीषा प्रताप घाडगे, द्रोपदी रामचंद्र घाडगे एकूण केळीचे क्षेत्र आठ एकर भुईसपाट झाले आहे. काही वेळात होत्याचे नव्हते झाले. यात जवळपास 35 लाख रुपये अंदाजित नुकसान झाले आहे. तसेच तुकाराम घाडगे , किशन घाडगे यांची 5 एकर वरील तर कासापुरी येथील 3 शेतकऱ्यांचे 6 एकर केळी बाग उध्वस्त झाली. त्याचबरोबर पाथरी येथील संजू पामे, हरिकिशन गायकवाड, राजेभाऊ देवडे, उद्धव सत्वधर यांची आठ एकर केळी बाग जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तातडीने पंचनामे करा केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी. - एकनाथ घाडगे, संचालक बाजार समिती पाथरी