पाथरी : लॉकडाऊन उठल्यानंतरही केळीचे भाव पडलेलेच आहेत. त्यामुळे शेतातील केळी विक्रीसाठी परवडत नाही. १ हजार २०० रुपये क्विंटल मिळणारा भाव ३०० ते ५०० रुपयापर्यंत कमी आला आहे. त्यामुळे कासापुरी येथील शेतकरी गणेश कोल्हे यांनी अडीच एकर केळी पिकावर नांगर फरविल्याने त्यांना चार लाख रुपयांचा फटका बसला आहे.
दरवर्षी केळी पिकाला चांगले मार्केट असते. त्यामुळे बागायतदार शेतकरी मोठा खर्च करून केळी लागवड करतो. पाथरी तालुक्यात केळीचे क्षेत्र ५१० एकरवर आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु होते. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रांत कोसळली. दरम्यान केळीचे दर अचानक पडले. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील शेतकरी गणेश वशिष्ठराव कोल्हे यांनी आपल्या गट नंंबर १७५ मध्ये कासापूरी शिवारात जून २०१९ मध्ये अडीच एकर शेतात साडेतीन हजार केळीची झाडे लावले होती. सदरील केळीच्या झाडास वर्षभर चांगली मेहनत घेतली. केळीवर तब्बल दीड लाख रुपये खर्चही केला, मात्र आता केळीला भावच राहिला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यावर केळी पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. एक हजार ते बाराशे रुपये क्विंटल केळीला भाव नेहमी असतो. मात्र सध्या तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत भाव घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यास हे परवडत नाही. केळीची जोपासणा करणेही मुश्कील होऊन बसल्याने सदरील शेतकऱ्याने ५ नोव्हेंबर रोजी केळीवर नांगर फिरवला आहे. सदरील शेतकऱ्याचे यामुळे चार लाख लाखांचे नुकसान झाले आहे.
दहा वर्षात पहिल्यांदा परिस्थिती वाईटदसऱ्यानंतर केळीचे भाव कमालीचे गडगडले आहेत. व्यापारी केळीच्या फडाकडे मंदी आल्याचे करण देऊन फिरकतच नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. केळीची बाग खरेदी केली तर अर्धा माल फेकून दिला जातो. त्यामुळे शेवटी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. परिणामी नांगर फिरवावा लागला. कासापुरी येथील हे शेतकरी मागील 10 वर्षापासून केळीची बाग घेतात. मात्र यावर्षीसारखी परिस्थिती कधीच उद्भवली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.