जिंतूर : शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेऊन बारामतीच्या काका- पुतण्यांनी राज्यांमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. मात्र स्वतःच्या राजकारणासाठी मराठा समाजाचा वापर केला. यामुळे समाज आरक्षणापासून वंचित राहिला असा घणाघात राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.
जिंतूर येथे बालब्रह्मचारी संत रामराव महाराज यांच्या अमृत महोत्सवी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री हंसराज आहेर, खासदार संजय जाधव, पोहरादेवी पीठाचे उत्तराधिकारी महंत बाबुसिंग महाराज, संत नेहरू महाराज, भाजपाचे रबदडे मामा जिल्हाध्यक्ष अभय चाटे ,सुरेश भुमरे, शहराध्यक्ष राजेश वट्टमवार, तालुका अध्यक्ष गीते, संयोजक मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस रसातळाला जात आहे. बारामतीचा राजकारणामूळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला. समाजाला काका पुतण्याने फसविले आहे. येत्या विधानसभेत महायुतीच्या 240 पेक्षा जास्त जागा येतील असेही ते यावेळी म्हणाले. तसेच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.