प्रसाद आर्वीकर, हिंगोली
Basmath Vidhan Sabha 2024: जिल्ह्यातील वसमत मतदारसंघातील लढत वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीत यावेळचा मुकाबला होत असून, शरद पवार गटाकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि अजित पवार गटाकडून त्यांचेच शिष्य असलेले आमदार राजू नवघरे मैदानात आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता ताणली आहे.
वसमत विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना विद्यमान आमदार राजू नवघरे यांचे गुरू मानले जाते.
२०१९ च्या निवडणुकीत दांडेगावकरांच्या पुढाकारातूनच आमदार राजू नवघरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादीत विभाजन झाले.
आता या निवडणुकीत शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेगावकर आणि अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार राजू नवघरे रिंगणात आहेत. त्यामुळे गुरू विरुद्ध शिष्य अशी होत असलेली येथील लढत सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
चंद्रकांत उर्फ राजूभैय्या नवघरेराष्ट्रवादी काँग्रेस (विजयी)७५,३२१ मते
ॲड.शिवाजी जाधवअपक्ष ६७०७० मते
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- मागील पाच वर्षांत टक्केवारी घेऊन विकासकामे केल्याचा मुद्दा यावेळच्या निवडणुकीत विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
- सूतगिरणी, टोकाई साखर कारखाना बंद पडल्याचा मुद्दाही निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आहे.
- मतदारसंघात औद्योगिक विकास झाला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. युवकांच्या हाताला रोजगार नसल्याने त्यांना कामाच्या शोधात मोठ्या शहरात स्थलांतर करावे लागते.
- शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचाही अभाव आहे. उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शेजारच्या जिल्ह्यात धाव घ्यावी लागते. आरोग्य सुविधांचा वानवा असून, हा मुद्दाही चर्चेत आहे.