परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आरोग्य विभागाची तयारी नसल्याने आणि विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे न दिल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडसावले. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अंग झटकून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी खा.बंडू जाधव, आ.डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे उपस्थित होते. आरोग्य यंत्रणेतील अनेक बाबींची पुरेशी माहिती अधिकारी देऊ शकले नाहीत. त्यामुळे केंद्रेकर यांनी संतप्त होऊन अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तसेच जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना खाजगी डॉक्टर्स अजूनही खुले पणाने सहकार्य करीत नसल्याबद्दल केंद्रेकर यांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील रस्त्यावर नागरिक खुलेआम फिरत असतील तर दीर्घ संचारबंदी लागू करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
सुविधा पुरवाबैठकीनंतर केंद्रेकर यांनी जिल्हा रुग्णालयात जावून कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांनी सुविधा, औषधोपचार मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर केंद्रेकर यांनी योग्य पद्धतीने उपचार करा, सुविधा पुरवा असे सांगितले.