परभणी : मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांच्या सवयी बदलल्या आहेत. टीव्हीसमोर बसून जेवण करण्याची सवय वाढत चालली असून, या सवयींमुळे पोटविकार वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
अन्न आणि पाणी या दोन माध्यमातून होणारे इन्फेक्शन थेट पोटावर परिणाम करते. लॉकडाऊन काळात हॉटेल्स, बेकरी आदी व्यवसाय बंद असल्याने मुलांना शक्यतो घरचे अन्न मिळाले. त्यामुळे इतर आजारांसह पोटाच्या आजाराचे रुग्ण कमी झाले, हे वस्तुस्थिती आहे. मात्र याच काळात मुलांमध्ये पोटाच्या समस्या वाढल्याचे दिसनू येत आहे. एकाच ठिकाणी बसून राहणे, टीव्हीसमोर बसून जेवण करणे, दिवसभर मोबाईल खेळत असताना वारंवार खात राहणे, अशा सवयी जाणवत आहेत. यातून मुले किती खात आहेत, काय खात आहेत, याचे भान राहत नाही व त्यातून पोटाच्या समस्या निर्माण होत आहेत.
या समस्या गंभीर स्वरुपाच्या नसल्या तरी मुलांमध्ये पोटविकार वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. लॉकडाऊनमुळे मुलांच्या सवयी बदलल्या आहेत. त्यातून हे प्रकार होत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडून नियमित व्यायाम करून घ्यावे त्याचप्रमाणे टीव्हीसमोर बसून अथवा मोबाईल पाहताना मुलांना जेवण देणे कटाक्षाने टाळले पाहिजे तरच मुलांचे आरोग्य सुदृढ राहू शकणार आहे.
खाणे आणि पिणे या दोन्ही बाबी पोटाशी संदर्भित येतात. त्यामुळे दूषित पदार्थ खाणे आणि दूषित पाणी पिणे या दोन्हींमुळे पोटदुखी होऊ शकते. उघड्यावरील अन्न खाणे, पाण्याचे निर्जंतुकीकरण न करता पाणी पिणे यामुळे पोटदुखीसारखे आजार उद्भवतात.
पोटविकाराची प्रमुख कारणे
शारीरिक हालचाल कमी असणे, दररोज व्यायाम न करणे, एकाच ठिकाणी बसून राहणे यामुळेदेखील पोटाचे विकार उद्भवतात. मोठ्या माणसांमध्ये व्यसनांमुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही पोटविकार जडतात.
मागच्या दीड-दोन वर्षापासून मुलांच्या शाळा बंद आहेत. त्यामुळे त्यांचे दिवसाचे गणितच बिघडले आहे. शाळा सुरू असताना मध्यंतरात डबा खाणे, शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी जेवण, रात्रीचे जेवण असा दिनक्रम ठरलेला होता. मात्र मागच्या काही दिवसांपासून हा दिनक्रम बदलला आहे. एका वेळी बसून जेवण करण्यापेक्षा दिवसभर काही ना काही खाण्याची सवय लागली आहे. करमत नसल्याचे कारण मुलांकडून दिले जाते. शिस्त लागत नाहीत.
कविता गमे, गृहिणी
दोन वर्षापासून शाळा बंद असल्याने मुलांचा दिनक्रम बदलला आहे. अभ्यास राहिला नाही. बाहेर खेळायला पाठविता येत नाही. सोबत खेळायलाही कोणी नाही. त्यामुळे टीव्ही पाहणे, मोबाईल खेळणे हे प्रकार वाढले आहेत. जेवणाच्या वेळाही बदलल्या असून, टीव्हीशिवाय मुले जेवण करीत नाहीत. आता तर मुलांना टीव्ही पाहत जेवण करण्याची सवयच लागली आहे. अनेक वेळा सांगूनही मुलांच्या या सवयीत बदल होत नाही.
शिवकन्या पारटकर,
गृहिणी
पोटविकार टाळायचे असतील तर...
अन्न आणि पाणी या दोन्हींमुळेच पोटाचे विकार होतात, हे निश्चित. त्यामुळे पोटविकार टाळण्यासाठी अन्न व पाणी शुद्ध असावे.
बाहेरचे उघड्यावरचे अन्न खाणे टाळले पाहिजे. दरररोज जेवणाच्या वेळा निश्चित करून त्यानुसारच आहार घ्यावा.
नियमित शारीरिक व्यायाम, मैदानी खेळ मुलांनी खेळले पाहिजेत.
लॉकडाऊन काळात पोटासह इतर आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. लोक घराबाहेर पडले नाहीत. लॉकडाऊनमुळे बाहेरील पदार्थ खाणे जवळपास बंद आहे. त्यामुळे मुलांना घरचेच पदार्थ खाण्यासाठी दिले जातात. त्यामुळे पोटाचे विकार कमी झाले आहेत. मात्र शहरी भागात टीव्हीसमोर बसून खात राहणे, मोबाईल पाहताना काही ना काही खात राहणे, या सवयी मुलांसाठी निश्चितच घातक आहेत. त्या टाळल्याच पाहिजेत. या सवयींमुळे पोटाचे आजार, स्थूलपणा वाढतो. ही बाब मुलांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. त्यामुळे मुलांच्या जेवणाच्या वेळा निश्चित असल्या पाहिजेत. जेवणात प्रोटीन, दूध, भाजींचा समावेश असावा. नियमितपणे मैदानी खेळ खेळणे, व्यायाम करणे आदी सवयी मुलांना लावणे आवश्यक आहे. पालकांनीच याविषयीची काळजी घेतली तर पोटविकार टळू शकतात.
डॉ. भगवान कोरडे, पोटविकार तज्ज्ञ