परभणी शहरात ३ पोलीस ठाणे आहेत. शहराचा विस्तार वाढला आहे. यात अनेक भागातील गल्लीबोळात तसेच नवीन वसाहती व शहरा बाहेरील काही भागात पोलीस गस्तीसाठी फारसे ये-जा करताना दिसून येत नाहीत. याचा फायदा काही युवक, तरुणाई घेताना दिसून येते. मित्रमंडळ, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्या मागे किती पाठबळ आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जातो. शहरात असे होणारे प्रकार टाळण्यासाठी पोलीसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तर गुन्हा दाखल
- रस्त्यावर वाहन उभे करुन केक कापणे
- तलवारीने केप कापणे
- डीजे गाणी लावून रस्त्यावर गोंधळ घालणे
- मध्यरात्री फटाके फोडणे
- सार्वजनिक नागरिकांच्या हितास बाधा पोहचविणे
या भागात वाढले प्रकार
सुपर मार्केट, देशमुख हाँटेल, उघडा महादेव मंदिर परिसर, वसमत रोड, वांगी रोड, हडको, धार रोड, लोकमान्य नगर, बाजारपेठेतील काही भाग, स्टेशन रोड, सरकारी दवाखाना परिसर, दर्गा रोड, जिंतूर रोड, बाजार समिती रस्ता, कडबी मंडी.
बीट मार्शलची गस्त आवश्यक
शहरातील ३ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक १० ते १५ वसाहतीसाठी बीट मार्शल नियुक्त केले जातात. त्यांच्या हद्दीत येणाऱ्या भागात त्यांची गस्त दररोज होणे आवश्यक आहे. या ठिकाणांची माहिती घेऊन असे प्रकार करुन रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या युवकांना समज देत वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
हटकणाऱ्यांनाच दमदाटी
शहरातील काही टारगट मुलांकडून असे प्रकार करताना एखाद्याने हटकल्यास त्यांनाच दमदाटी केली जाते. यामुळे जिथे असे प्रकार घडतात तेथे तक्रार देण्यास किंवा पोलीसांना कळविण्यास सर्वसामान्य धजावत नाहीत. यामुळे पोलीसांनी असे प्रकार घडू नयेत, यासाठी रात्री ११ पासून सर्व रस्त्यांनी गस्त घालावी.