परभणी : गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस उपवासाला भगर खाल्ल्याने जिल्ह्यातील ८० जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील ५० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
एकादशी आणि महाशिवरात्री हे दोन उपवासाचे दिवस सलग आल्याने बाजारपेठेत साबुदाणा, भगर, पेंडखजूर यासह इतर वस्तूंना मोठी मागणी दिसून आली. परंतु दुसरीकडे गुरुवारी भगर खाल्ल्याने ९ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर शुक्रवारी परभणी तालुक्यातील झरी येथे ४, इठलापूर येथे ६, ब्रह्मपुरी ३, अवलगाव १, बोरवंड १, बडवली १, खडका १ व परभणी शहरातील विविध भागांतील १६, तसेच पेडगाव येथील १९, गंगाखेड येथील १० अशा एकूण ८० जणांना भगर सेवन केल्यानंतर मळमळ, उलटी आदी त्रास जाणू लागला. या सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णांवर आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोत्तम उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी दिली.
पेडगाव प्रा. आ. केंद्रात १९ जणांवर उपचारपरभणी तालुक्यातील पेडगाव येथील ग्रामस्थांनी भगरीचे सेवन केल्यामुळे त्यांना उलटी आणि मळमळचा त्रास सुरू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्याचबरोबर या गावाला लागूनच असलेल्या गोविंदपुर वाडी येथील २ व काष्टगाव येथील २ अशा एकूण १९ रुग्णांवर पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विषबाधा झालेली रुग्णसंख्या ही ८० पोहचली आहे. या सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले.