तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी झालेल्या मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. निवडणुकीच्या निकालानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गुंजेगाव येथील रावसाहेब रंगनाथ मोटे हे त्यांच्या शेत आखाड्यावर होते. तेव्हा गावातील प्रकाश सोपान धुळगुंडे, अंगद बाबाराव मोटे, माधव संतराम इमडे व माधव मुंजाजी इमडे यांनी मतदान का केला नाहीस, असे म्हणत रावसाहेब मोटे यांना शिवीगाळ व थापड बुक्क्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद सोमवार रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास रावसाहेब मोटे यांनी दिल्यावरून पिंपळदरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास जमादार प्रदीप सपकाळ हे करीत आहेत.
शांतता राखण्याचे आवाहन
ग्रामपंचायत निवडणुकीतील हेव्यादाव्यातून ग्रामीण भागातील गावागावांत अंतर्गत कुरबुऱ्या वाढल्या असल्याचे या घटनेवरून समोर येत असून, ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली आहे. ग्रामीण भागातील गाव पुढाऱ्यांनी निवडणुकीदरम्यानचे हेवे दावे विसरून, गावात एकोप्याने शांतता राखावी, असे अवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.