सुभाष हरिभाऊ टाक यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींचे टिप्पर बसला साईड देत नव्हते. त्यामुळे टिप्परला ओव्हरटेक करून दैठणा येथे बस उभी करण्यात आली. यावेळी टिप्पर चालकाने बसच्या समोर टिप्पर आडवे लावून बस चालकाला खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बसच्या काचा फोडल्या. या फिर्यादीवरून आरोपी यायाखान पठाण, पिंटू जंगले, सिकंदर खान पठाण, शेख रफिक शेख रशीद आदींविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांच्या न्यायालयासमोर चालविण्यात आले. १६ जून रोजी या प्रकरणाचा निकाल न्या.ओंकार देशमुख यांनी दिला. आरोपी यायाखान पठाण, पिंटू जंगले, सिकंदर खान पठाण, शेख रफिक शेख रशीद यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड सुनावण्यात आला. या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील बी.बी. घटे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, कर्मचारी सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
बसचालकास मारहाण; चौघांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:13 AM