विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून विभागातील सर्व कार्यालय, शाळा, अंगणवाडी, उपकेंद्र आदी कार्यालयांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि कार्यालयीन कामकाज पद्धती यामध्ये विशेष बदल करण्यासाठी 'सुंदर माझे कार्यालय' हेअभियान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यालय सहभागी झाले असून प्रत्येक कार्यालयामध्ये रंगरंगोटीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या अभियानात आता महिला व बालविकास विभागानेही जोरदार तयारी सुरु केली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांचे बदललेले रुपडे पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १ हजार ७०० अंगणवाडी केंद्र असून अभियानापूर्वी ५०० अंगणवाडी केंद्राची रंगरंगोटी करण्यात आली होती. या अभियान काळात आत्तापर्यंत ३०० अंगणवाडी केंद्रांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. आणखी २०० अंगणवाडी केंद्रांची रंगरंगोटी सुरू आहे. यामध्ये गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचे सहकार्य मिळत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी सांगितले.
" जिल्ह्यात ‘सुंदर माझी अंगणवाडी’ या अभियानात उत्कृष्ट काम सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची रंगरंगोटी, स्वच्छता, उत्कृष्ट आहार आणि शिक्षण या चतुसुत्रीचा संगम जुळून आला तर अंगणवाडी केंद्र बालकांसाठी गोकुळ ठरेल असा विश्वास जि.प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केला. जि.प. महिला व बालकल्याण सभापती शोभाबाई घाटगे यांनींही यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोडके यांच्यामार्फत समाधानकारक काम सुरू असल्याचे सांगितले.