प्रसाद आर्वीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृती आराखडा तयार करून कामांना मान्यता दिल्यानंतरही तब्बल १ हजार ९० कामांना अद्याप मुहूर्त लागला नसल्याने योजना कार्यान्वित होऊनही त्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नसल्याचे दिसत आहे़ यातील बहुतांश कामे मागील वर्षीची असून, ही कामे का सुरू झाली नाहीत? या विषयी मात्र प्रशासनाकडून कारवाई किंवा उपाययोजना होत नसल्याने ठप्प कामांची संख्या वाढत आहे़राज्यातील दुष्काळावर मात करण्याच्या हेतूने जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात आली़ शासनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून या योजनेकडे पाहिले जात असले तरी या योजनेतही प्रशासकीय उदासिनता दिसून येत आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात योजनेंतर्गत प्रभावी कामकाज झाले़ परंतु, त्यानंतरच्या टप्प्यात मात्र कामांना मरगळ आल्याचे दिसते़ राज्य शासनाने पाच ते सहा विभागांना एकत्र करून जलसंधारणाच्या कामाची आखणी केली़ जलसंधारणाच्या कामांमधून शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध व्हावा, हे पाणी उन्हाळ्यामध्ये पिकांना उपलब्ध व्हावे आणि दुष्काळपासून मुक्तता मिळावी, या उद्देशाने जिल्ह्यात योजनेची कामे केली जात आहेत़ दरवर्षी गावांची निवड करून त्यात गावात जलसंधारणाची कामे हाती घेतली जात आहेत़यावर्षी २ हजार २६७ कामांचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला़ या सर्व कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली़ ५३ कोटी ९६ लाख ७६ हजारांची ही कामे असून, एवढ्या मोठ्या संख्येने जलसंधारणाची कामे जिल्ह्यात सुरू झाली असली तरी जिल्ह्यातील दुष्काळ मात्र हटलेला नाही़ यावर्षीच्या कामांपैकी आतापर्यंत १ हजार ७२९ कामे पूर्ण झाली आहेत़ ४०९ कामे प्रगतीपथावर आहेत तर १०९ कामे अद्यापही सुरू झाली नाहीत़ ४३ कोटी ४१ लाख ६९ हजार रुपयांची कामे सुरू करण्यात आली असून, प्रत्यक्षात ९ कोटी ६५ लाख २२ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ गतवर्षीची परिस्थिती अधिकच बिकट आहे़ गतवर्षी २ हजार २६३ कामांचा आराखडा तयार करण्यात आला होता़ २ हजार १६२ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली़ त्यापैकी ९८१ कामे अजूनही सुरू झाली नाहीत़ दोन्ही वर्षांची मिळून १ हजार ९० कामे ठप्प आहेत़ यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पाऊस नसल्याने जलसंधारणाची कामे करण्यासाठी प्रशासनाकडे मोठा वाव आहे़ परंतु, प्रशासकीय उदासिनतेमुळे १ हजार कामे ठप्प आहेत़ ही कामे जून महिन्यापूर्वी पूर्ण झाली तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होवू शकतो़ तेव्हा जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर लक्ष केंद्रित करून कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे़सलग समतलचरची सर्वाधिक ठप्प कामे४या योजनेंतर्गत जलसंधारणाची विविध कामे घेतली जातात़ मागील वर्षी १२४ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली़ त्यापैकी सलग समतलचरच्या ३१७ कामांना अद्यापही सुरुवात झाली नाही़ तसेच कृषी विभागांतर्गत शेततळे, वनतळे, खोद तळ्यांची तब्बल २२० कामे ठप्प आहेत़ त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे सिमेंट नाला बांध, सिमेंट साठवण बंधारा, वळण बंधाऱ्याची ७, जालना जलसंधारण विभागांतर्गत गॅबियन बंधाºयाची ५०, कृषी विभागाच्या गॅबीयन बंधाºयाची ५०, विहीर, बोअर पुनर्भरणाची १७६, कृषी विभागांतर्गत नाला खोलीकरण, रुंदीकरणाची १४७, जिल्हा परिषदेंतर्गत २२ आणि जालना येथील जलसंधारण विभागांतर्गत नाला खोलीकरण, रुंदीकरणाची १८४ कामे वर्ष संपले तरीही सुरू झाली नाहीत़यावर्षीच्या आराखड्यामध्ये सिमेंट नाला बंधारा ५८, शेततळे २९, ढाळीचे बांध ७, सलग समतलचर ३, नाला खोलीकरण ५ अशा १०९ कामांना अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाही़ दोन्ही वर्षांतील १ हजार ९० कामे अद्यापही सुरू झाली नाहीत़ त्यामुळे या कामांना गती देऊन कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी होत आह़े़गाळ काढण्यास दिला फाटापरतीचा पाऊस न झाल्याने अनेक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. या प्रकल्पांमधील गाळ उपासण्यासाठी एक चांगली संधी प्रशासनाला उपलब्ध झाली आहे़ प्रत्येक तालुक्यांमध्ये असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव आणि सिंचन तलावांमध्ये गाळ उपसून तो शेतामध्ये टाकला तर तलावाची साठवण क्षमता वाढणार आहे़ तसेच शेत जमीन सुपिक होण्यास मदत होऊ शकते़योजनेचा पहिल्या टप्प्यात गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले होते़ मात्र त्यानंतर या कामांकडे पाठ फिरविण्यात आली आहे़कामांची मुदत वाढविण्याची मागणी४यावर्षीची जलयुक्त शिवार योजनेंतर्गतची कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे़ त्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे आवश्यक आहे़४यावर्षीची कामे या मुदतीत पूर्ण होतील़ परंतु, मागील वर्षीची कामे अजूनही सुरू झाली नाहीत़४त्यामुळे रखडलेली व ठप्प असलेली कामे पूर्ण करण्यासाठी योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कृषी विभागाने केली आहे़
जलसंधारणाच्या १०९० कामांना लागेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:48 PM