परभणी : महानगरपालिकेकडून घरपट्टी दिली जात नसल्याने शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिक रमाई घरकूल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या प्रश्नी सोमवारी रिपब्लिकन सेनेने राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी महापालिकेत आंदोलन करत वंचितांना घरकुल देण्याची मागणी केली.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दारिद्रय रेषेखालील असलेल्या व नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी पक्के घरे बांधण्याची तरतूद शासनाने केली आहे. या योजनेमुळे स्वत:चा निवारा उपलब्ध होईल, अशी आशा या लाभार्थ्यांत निर्माण झाली होती़ मात्र महापालिका झोपडपट्टी भागामध्ये घरपट्टी देत नाही़ त्यामुळे घरकुलाचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत़ एकीकडे रमाई घरकूल योजनेची पुरेपूर अंमलबजावणी करा, असा आदेश शासन सामाजिक न्याय विभागाला देत आहे़ तर दुसरीकडे महापालिका यात खोडा घालत आहे़ त्यामुळे लाभार्थी घरकुलापासून वंचित राहत असून, घरपट्टी द्यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महापालिकेतील आयुक्तांच्या कक्षासमोर आंदोलन करण्यात केले.
दरम्यान, आंदोलकांनी मनपाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्नही यावेळी केला. महापालिकेंतर्गत २०१७-१८ या वर्षांत १८०० घरकुलांचे उद्दिष्ट दिल आहे़ घरकुलाच्या मागणीसाठी मनपाकडे २२०० अर्ज दाखल झाले असून, १ हजार ३०० घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित ९०० लाभार्थी घरपट्टी मिळत नसल्याने वंचित राहिले आहेत.या लाभार्थ्यांनासुद्धा घरकुल मिळावे अशी यावेळी मागणी करण्यात आली.