सोनपेठ तालुक्यातील कालव्याची दुरवस्था
सोनपेठ : तालुक्यातील वाहणाऱ्या माजलगाव उजव्या कालव्याची दुरवस्था झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी कालव्याच्या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोनपेठ तालुक्यात माजलगाव प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडण्यात येत आहे; परंतु माजलगाव उजवा कालवा प्रकल्पाचे कालवा व चाऱ्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यापूर्वी साफसफाई केली नाही. त्यामुळे कालव्यातून सोडलेल्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे.
सोन्याच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार वाढले
सोनपेठ : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटण्याच्या चार महिन्यांत दोन घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्तींशी संपर्क करून त्यांना विश्वासात घेत त्यांची लूट केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. चार महिन्यांत २३ ऑगस्ट २०२० रोजी हिंगोली येथील एकास व त्यानंतर ३ जानेवारी रोजी गंगाखेड तालुक्यातील गोविंदवाडी येथे एकास लुटण्याचा प्रकार घडला आहे.
परभणी शहराचे विद्रुपीकरण
परभणी : फुकट्या जाहिरातदारांमुळे एकीकडे शहराचे विद्रुपीकरण होत असताना दुसरीकडे महानगरपालिकेच्या हक्काचा महसूल बुडत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. परभणी शहरातील विविध ठिकाणच्या मोक्याच्या जागेवर तसेच मनपाच्या जागेवर व्यावसायिक स्वरूपाच्या जाहिराती लावण्याचे कंत्राट देऊन त्याद्वारे लाखो रुपयांचा महसूल महानगर पालिकेच्या तिजोरीत जमा करण्याचे काम तीन वर्षांपूर्वीपर्यंत सुरू होते; परंतु त्यानंतर फुकट्या जाहिरातदारांचे प्रमाण वाढले आहे.
गुळगुळीत रस्त्यावर खोदकाम वाढले
परभणी : आठ दिवसांपूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करून काही प्रमाणात का होईना नागरिकांना मिळालेला दिलासा अल्पकाळाचाच ठरला आहे. याच रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करून पुन्हा जैसे थे खड्डे करण्याचे काम मनपाने केले आहे. विशेष म्हणजे गुळगुळीत रस्त्यावर मागील काही दिवसांपासून जलवाहिनीसाठी खोदकाम वाढल्याचे दिसून येत आहे.