जिल्ह्यात मागील काही महिन्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर करून किंवा मोबाइल आणि ई-मेलवर फिशिंग ई-मेल पाठवून ते खरे असल्याचे भासविले जात आहे. यात वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जाते. यातून माहिती भरल्यानंतर फसवणूक करणारे तुम्हाला लॉटरी लागली आहे? या लॉटरीतील बक्षीस मिळविण्यासाठी काही रक्कम भरा, त्यानंतर तुम्हाला बक्षीस दिले जाईल, असा संदेश देतात. याला बळी न पडलेले बरे. यातून आर्थिक फसवणूक घडते. परभणी शहरात असे प्रकार अनेकांच्या बाबतीत घडले आहेत, मात्र तक्रार अर्ज किंवा गुन्हा नोंदविण्यास फसवणूक झालेले व्यक्ती टाळाटाळ करतात.
फिशिंग ई-मेल
एखाद्या कंपनीच्या नावाने ई-मेल किंवा मेसेज मोबाइलवर पाठवले जातात. ज्या कंपनी किंवा बँकेचे नाव सर्वसामान्यांना माहीत आहे. अशा नावांचा गैरवापर करून आपला पासवर्ड, एटीएम पिन, क्रेडिट कार्डची माहिती चोरी केली जाते. यातून फसवणूक होते. यामुळे फिशिंग मेल आणि खरे मेल यातील फरक ओळखून कोणतीही माहिती भरावी तसेच कागदपत्रे त्यावर सादर करावीत.
ही घ्या काळजी
सध्या अनेक ठिकाणी ओपन पब्लिक वायफाय उपलब्ध करून दिले आहेत. रेल्वेस्टेशन, बसस्थानक तसेच अन्य काही ठिकाणी असे वायफाय उपलब्ध आहेत. मात्र, अशा ठिकाणी वायफायला आपला मोबाइल जोडू नये. मोबाइलमधील सर्व डाटा यातून चोरी होण्याचा धोका असतो. याकरिता फोनची ऑपरेटिंग सिस्टिम अद्ययावत असावी व सर्व पासवर्ड सतत बदलत रहावे.
वेबसाईटची सुरुवात एचटीटीपीएसपासून झाली आहे का?
कोणत्याही वेबसाईटला सुरू करताना त्या वेबसाइटची सुरुवात एचटीटीपीएसपासून सुरू झाली आहे का ? हे पाहणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त अन्य वेबसाईटला भेट देताना गोपनीय माहिती त्यावर टाकू नये अन्यथा फसवणूक होऊ शकते.
लॉटरी लागली म्हणून दोन लाख उकळले
१) परभणी शहरात एका उच्चशिक्षित महिलेची अशाच एका प्रकरणात फसवणूक झाली आहे. या महिलेला बक्षीस म्हणून ११ लाखांची जीप लागल्याची माहिती देऊन फसवणूक करण्यात आली. महिलेनेही या प्रकरणात जवळपास २ लाख रुपये संबंधित लॉटरीचा बेबनाव करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या खात्यावर टाकले. मात्र, यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महिलेने फसवणूक झाल्याचे समजून पोलिसांची भेट घेतली होती. मात्र, पुढे गुन्हा नोंद झाला नाही.
२) १० लाख रुपयाची लॉटरी लागली असे सांगून एका पेन्शनर व्यक्तीला मोबाइलद्वारे फसवणूक करणाऱ्यांनी मेसेज पाठविला. त्यानुसार या व्यक्तीनेही १० लाखाच्या लॉटरीचा मोह न आवरल्याने २० ते ३० हजारांची रक्कम भरली होती. यानंतर पुन्हा पैशांची मागणी होत असल्याने त्यांनी पोलिसांकडे जाऊन हकिकत सांगितली. पोलिसांनी संबंधितास पैसे देऊ नका, फसवणूक होईल, असे सांगितल्याने पुढील प्रकरण टळले.