स्पर्धेच्या युगात स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अनेक वेळा धकाधकीच्या कामकाजामध्ये पुरेशी झोप मिळत नाही. पर्यायाने इतर आजार उद्भवू शकतात. त्यामुळे ६ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.
किमान सहा तास झोप आवश्यक
सर्वसाधारणपणे कार्यमग्न असणाऱ्या नागरिकांनी किमान ६ तास झोप घेणे आवश्यक आहे. ६ तासांची ही झोप माणसाला आरोग्यवर्धक ठरते. त्यामुळे झोपेच्या वेळा ठरवून त्या वेळेत झोप घेतल्यास प्रत्येकाचे आरोग्य चांगले राहू शकते.
रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीराची ढाल
रोग प्रतिकारशक्ती ही आपल्या शरीराची ढाल आहे. सकस आहार, दररोज व्यायाम आणि झोप या तीनही बाबी संतुलित प्रमाणात ठेवल्या तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे आहार, व्यायाम बरोबरच झोपही महत्वपूर्ण आहे. झोप येत नसल्यास किंवा कमी होत असल्यास मधुमेह, रक्तदान, डोकेदुखी यासारखे आजार उद्भवू शकतात.
संतुलित आहार आणि व्यायाम ही आवश्यक
प्रकृती सदृढ ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम ही तेवढाच महत्त्वाचा आहे. आहारामध्ये प्रोटिन्स आणि इतर व्हिटॅमिन असणाऱ्या पदार्थांचा समावेश असावा. तसेच दररोज किमान एक तास व्यायाम, योगासने आणि ध्यान करणे गरजेचे आहे.
अपुऱ्या झोपेचे तोटे
वयोमानानुसार झोपेचे तास निश्चित केलेले आहेत. त्यानुसार सर्वसाधारणपणे ६ ते ८ तास झोप घेणे आवश्यक आहे.
ही झोप न मिळाल्यास चिडचिड वाढते. सातत्याने कमी झोप होत असेल तर मधुमेह, रक्तदाब, स्थूलपणा, डोकेदुखी हे आजार जडू शकतात.
झोपेचे दोन प्रकार आहेत. त्यात आरईएम आणि एनआरईएम या प्रकाराचा समावेश आहे. प्रत्येकाची स्लीप सायकल पूर्ण करण्यासाठी ६ ते ८ तास पर्यंतची झोप आवश्यक असते. व्यवस्थित झोप झाली तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे योग्य झोप आरोग्यवर्धक ठरते.
- डॉ. रामेश्वर नाईक