जिल्ह्यात मागील एक वर्षापासून कोरोनाच्या काळात अनेकांची नोकरी गेली. यामुळे बेरोजगार युवकांंकडून नवीन नोकरी मिळविण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. याचा फायदा घेत काही डमी वेबसाईट हॅकर्सनी तयार केल्या आहेत. या वेबसाईटवर नोंदणी करून नोकरी देण्याचा फंडा काहीजणांनी या काळात राबविला. याच डमी वेबसाईटवर अनेक बेरोजगारांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांसह वैयक्तिक कागदपत्रे यांची माहिती सादर करून नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात अनेकांची फसगत झाली आहे. विशेष म्हणजे, फसवणूक होऊनही अनेकजण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत, हे विशेष. यामुळे शासकीय नोकरी असो की खासगी यासाठी वेबसाईट अधिकृत आहे की नाही, याची शहानिशा केल्याशिवाय कोणतीही माहिती, तसेच कागदपत्रे सादर करणे महागात पडू शकते.
ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी नाहीत
जिल्ह्यात शासकीय नोकरी लावतो, या आमिषाला बळी पडून अनेकांची फसवणूक झाली आहे. या प्रकाराबाबत अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. मात्र, ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
अशी करा खातरजमा
नेटवर सर्च करताना अनेक वेबसाईट दिसतात. अशावेळी ज्या वेबसाईटच्या सुरुवातीला आणि शेवटी एचटीटीपीएस असे शब्द असतील अशाच वेबसाईटला सिक्युअर समजून भेट द्यावी. व तेथून माहिती घेत आपली माहिती सादर करावी. याशिवाय अन्य जीओव्ही डाॅट इन व डाॅट एनआयसी या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी.
संकेतस्थळाबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवा
अनोळखी लिंक्स किंवा संकेतस्थळावर जाण्याचे टाळा
धोकादायक आणि फेक संकेतस्थळांना अँटिव्हायरसद्वारे ब्लाॅक करा
अशी होऊ शकते फसवणूक
एखाद्या संकेतस्थळावर माहिती घेण्यासाठी भेट दिली असता तेथे जाॅब साईट दिसल्यास त्याची सुरवातीला खात्री करा. ती वेबसाईट सिक्युअर असल्यास माहिती शेअर करा. अनेकदा युवक नोकरी मिळविण्याच्या नादात आपले शैक्षणिक कागदपत्रे, वैयक्तिक कागदपत्रे या ठिकाणी स्कॅन करून किंवा पीडीएफ करून थेट टाकतात. यानंतर संबंधित डमी वेबसाईटधारक या संबंधित व्यक्तीला बँकेत खाते काढण्यास सांगतात किंवा आमच्या खात्यात एवढे पैसे टाका, असे सांगतात. यावेळी संबंधिताने नकार दिल्यास त्याला डमी वकिलामार्फत खोटे कागदपत्र संबंधिताच्या मेलवर पाठवून तुम्हाला कंपनीने या पदासाठी इतक्या वर्षासाठी नियुक्त केले आहे. तुम्ही असे पैसे न भरता ही जागा सोेडल्यास आम्ही कंपनीतर्फे तुमच्यावर केस दाखल करू, अशी धमकी देतात. या धमकीला घाबरुनच अनेकजण फसवणूक करून घेतात आणि विशेष म्हणजे पोलिसांकडे तक्रारही करत नाहीत.