जिंतूर तालुक्यात बिनविरोध ग्रामपंचायतीला २१ लाखांचा विकास निधी देऊ अशी घोषणा आ. मेघना बोर्डीकर यांनी केली होती. या घोषणेमुळे अनेक गावांनी निवडणूक न लढविता गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गावाच्या विकासासाठी २१ लाखांचा निधी मिळेल व या निधीतून रस्ते, नाल्या, विजेचा प्रश्न स्मशानभूमीचा प्रश्न आदी मूलभूत गोष्टी सोडविल्या जातील. यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील मानधनी, बोरगळवाडी, अंगलगाव तांडा, कौडगाव प्र. औंढा, जांभरून, बेलखेडा, येसेगाव, जुनूनवाडी, शेक, रिडज-ताठापूर, वाघी बोबडे या ११ ग्रामपंचायतींना आता प्रत्येकी २१ लाखांचा फंड द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे माजी आ. विजय भांबळे व विद्यमान आ. मेघना बोर्डीकर यांचे राजकीय हाडवैर संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. यावेळेस विजय भांबळे यांची सासुरवाडी असणारी येसेगाव ही ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे आता विजय भांबळे यांच्या सासुरवाडीला २१ लाख रुपये विकासकामासाठी मेघना बोर्डीकर यांना द्यावे लागणार आहेत.
याशिवाय तालुक्यातील खोल गाडगा २ जागा, सायखेडा (बामणी) ३ जागा, जांब खुर्द २ जागा, पिंपळगाव काजळे ५ जागा, गणपूर- नागठाणा २ जागा, उमरद- बेलखेडा २ जागा, पिंपराळा-डोणवाडा २ जागा, सोर्जा-भूसकवडी २ जागा व भोगाव येथील १० जागा, अशा एकूण २९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. या जागेलासुद्धा विकास निधी मिळणार का, हाही प्रश्न बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना पडला आहे.
भोगाव ग्रा.पं.च्या निधीबाबत साशंकता
एकीकडे बिनविरोध ग्रामपंचायतींना २१ लाखांचा निधी देणार अशी घोषणा झाली असताना आ. बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक असणारे भोगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या भोगाव ग्रामपंचायतीत १३ पैकी १० जागा बिनविरोध निवडून आल्या. मात्र, संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध न आल्याने हा निधी मिळणार की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.