बिडी, सिगारेट ओढण्याबरोबरच गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण जिल्हाभरात आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रापन केल्यास संबंधितास २०० रुपयांचा दंड आकारण्याची राज्य शासनाने तरतूद केली. शहरात ही कारवाई होते का? याची बुधवारी पाहणी केली.
बसस्थानक परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास फेरफटका मारला असता, एक प्रवासी गर्दीतही बिड्यांचे कश ओढत होता. या प्रवाशाच्या धुम्रपानामुळे इतर प्रवाशांना नाक दाबून थांबावे लागले. महिला प्रवाशांना तर त्याचा मोठा त्रास होत होता. विशेष म्हणजे, दंडात्मक कारवाई तर सोडाच कोणीही त्यास टोकलेही नाही. रेल्वेस्थानक परिसरातही काही जण मोकळ्या जागेत चक्क धुम्रपान करीत असल्याचे दिसून आले. महानगरपालिकेच्या आवारातही भेट दिली तेव्हा बिनधास्तपणे बिड, सिगारेट ओढली जात होती. या ठिकाणी देखील धुम्रपान करणाऱ्यास कोणी रोखले नाही. मागील वर्षभरात धुम्रपानाच्या विरोधात कारवयाच झाल्या नाहीत. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास कोणालाही भिती वाटत नाही किंवा कारवाईची धास्ती वाटत नाही. त्यामुळे हा प्रकार बळावत चालला आहे.
दंड वसूल करण्यास कुचराई
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याचे आढळल्यास संबंधितांकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे अधिकार बसस्थानक परिसरात आगार प्रमुख, रेल्वेस्थानक परिसरात स्थानक प्रमुख, शाळा- महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्य, महानगरपालिकेच्या आवारात आयुक्तांना आहेत. मात्र संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा उदासिन असल्याचे दिसते. आतापर्यंत अशा स्वरुपाचा दंड वसूल झालाच नसल्याने प्रकार बळावला आहे.
दंडाची माहितीच मिळेना
सार्वजनिक ठिकाणी बिडी, सिगारेट ओढल्यास संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे अधिकार अन्न व अीषध प्रशासन अधिकाऱ्यांना दिले आहेत. जिल्ह्यात अशा किती कारवाया झाल्या, याची माहिती घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासन अधिकारी नारायण सरकटे यांच्याशी संपर्क साधला मात्र, त्यांनी फोन न उचलल्याने प्रशासनाची बाजू समजू शकली नाही.
फुफ्फुसाचे आजार बळावतात
धुम्रपानामुळे फुफ्फुसाशी संदर्भित असलेले आजार बळावतात. दम्याचा त्रास वाढतो. याशिवाय फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार, मानसिक तणाव (हायपर टेन्शन), रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे धुम्रपान आणि व्यसनांना दूर ठेवल्यास निरोगी आणि शारीरिक सुदृढता प्राप्त होते, असे डाॅ.सुधीर काकडे यांनी सांगितले.