पाथरी (परभणी) : पाथरी बाजार समिती परिसरातील विवादित जागेवरील बेकायदेशीर उभारलेल्या 32 टिनशेडचे बांधकाम 30 दिवसाच्या आत पाडण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक यांनी दिले. या 32 दुकानांवर हातोडा पडणार असल्याने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सचिवांवर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.
बाजार समितीच्या आवारातील मोकळी जागा कापूस खरेदीसाठी 32 व्यापाऱ्यांना देण्याचा निर्णय तत्कालीन संचालक मंडळाने दि 29ऑक्टोबर 2020 रोजीच्या ठराव क्र 4 नुसार घेतला. या काळात मोकळ्या जागेवर व्यापाऱ्यांनी पक्के बांधकाम करत टिनशेड उभारले. दरम्यान, जागा बेकायदेशीर वाटप होऊन मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार भाजपचे उद्धव नाईक यांनी 27 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली. जिल्हा विशेष लेखाधिकारी परभणी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशी अवहाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांनी अधिनियम 1963 चे कलम 40 अंतर्गत कारवाईसाठी नोटीस बजावली. तसेच त्रिस्तरीय समितीचे गठन करण्यात आले होते. या त्रिस्तरीय समितीने 24 जुले 20 23 रोजी जिल्हा उपनिबंधक यांना अहवाल सादर केला. या अहवालानुसार परभणी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी 6 ऑक्टोबर रोजी विवादित जागेवरील अनधिकृपणे केलेले टिनशेडचे बांधकाम तात्काळ पाडण्याचे निर्देश दिले. 30 दिवसांच्या आत कारवाईकरून कार्यपूर्तीचा अहवाल सहायक निबंधक सेलू यांच्या मार्फत सादर करण्याचे आदेशात म्हंटले आहे.
सचिवावर 15 दिवसांत कारवाई बाजार समितीचे सचिव बी.जे. लिपणे यांच्यावर त्रिस्तरीय समितीने सादर केलेल्या अहवालातील अभिप्रायानुसार जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे . अधिनियम 1963 व त्या खालील नियम 1967 मधील तरतुदीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे सचिव लिपणे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.