- अभिमन्यू कांबळे
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विकृतीशास्त्र विभागामार्फत शेतकऱ्यांना गेल्या १४ वर्षांत कोट्यवधी रुपयांचे बायोमिक्स जैविक रसायन विक्री करण्यात आले. परंतु, त्यासाठी शासनाला द्यावा लागणारा जीएसटी व अन्य कर भरण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती विकृतीशास्त्र विभागामार्फत बायोमिक्स नावाचे जैव रसायन शेतकऱ्यांना विक्री केले जाते. हे हळद, आद्रक आदी पिकांसाठी उपयुक्त असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यामुळे या जैव रसायनाला अधिक प्रमाणात मागणी आहे. जैव रसायनाच्या एका किलोची बॅग ३०० रुपयांना शेतकऱ्यांना देण्यात येते. हे जैव रसायन बनविण्यासाठी दरवर्षी सध्याच्या दरानुसार अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचा कच्चा माल कृषी विद्यापीठ बाजारातून खरेदी करते. (विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून शहरातील एकाच दुकानातून निविदा न काढता विद्यापीठाकडून हा कच्चा माल खरेदी केला जात आहे.) त्यानंतर तयार केलेले जैव रसायन विक्री करीत असताना त्यावरील वस्तू व सेवा कर शासनाला देणे बंधनकारक आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
२००७-०८ पासून हे जैव रसायन विक्री करण्यात येत आहे. आतापर्यंत ८ कोटी ७५ लाख २४ हजार ७८० रुपयांच्या बायोमिक्स जैविक रसायनाची कृषी विद्यापीठाने विक्री केली आहे. त्यामध्ये २००७-०८ मध्ये २ लाख २६ हजार ९५० रुपये, २००८-०९ मध्ये २ लाख ११ हजार ८५० रुपये, २००९-१० मध्ये १ लाख ६७ हजार ६५० रुपये, २०१०-११ मध्ये २ लाख ९ हजार ९०० रुपये, २०११-१२ मध्ये २ लाख ४० हजार ४५० रुपये, २०१२-१३ मध्ये ५ लाख ७० हजार ५५० रुपये, २०१३-१४ मध्ये ७ लाख ६१ हजार ८०० रुपये, २०१४-१५ मध्ये ७ लाख २६ हजार, २०१५-१६ मध्ये १५ लाख ९७ हजार ९५० रुपये, २०१६-१७ मध्ये ४६ लाख २४ हजार ६०० रुपये, २०१७-१८ मध्ये ६३ लाख ६५ हजार १०० रुपये, २०१८-१९ मध्ये १ कोटी ४१ लाख ४१ हजार ९९८ रुपये, २०१९-२० मध्ये २ कोटी २५ लाख रुपये आणि २०२०-२१ या वर्षात जवळपास ३ कोटी ५० लाख रुपयांच्या बायोमिक्स जैव रसायनाची विक्री करण्यात आली आहे.
कोट्यवधी रुपयांचे बायोमिक्स रसायन गेल्या काही वर्षांत कृषी विद्यापीठाने विक्री करूनही यातून मिळणाऱ्या नफ्यावरील कर शासनाकडे भरण्यास विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष का केले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या लेखापरीक्षणात ही बाब समोर कशी काय आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
कच्चा मालाची एकाच दुकानातून खरेदी बायोमिक्स जैविक रसायन तयार कण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाची विद्यापीठाकडून परभणी शहरातील एकाच दुकानातून सातत्याने खरेदी करण्यात येत असल्याचे समजते. दरवषी हे जैव रसायन बनवण्यासाठी ८ ते १० लाख रुपयांचा कच्चा माल लागतो. यासाठी निविदाही काढण्यात आल्या नसल्याचे समजते.
१ एप्रिल २०२२ पासून जीएसटी भरण्यात येईलबायोमिक्स जैव रसायनाचा जीएसटी यादीत समावेश नाही. सद्यस्थितीत प्रायोगिक तत्वावर हे जैव रसायन विक्री केले जात आहे. यासाठी जीएसटी किती लागतो व अन्य बाबींवर संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे. १ एप्रिल २०२२ पासून यासाठीचा जीएसटी भरण्यात येईल. - डॉ. कल्याण आपेट, विभाग प्रमुख, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग