मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे ११ मार्च रोजी बायोगॅस प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना टाकसाळे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमास सरपंच नीता काजळे, उपसरपंच उमर खान पठाण, ग्रामसेविका मनीषा लोमटे, माऊली काजळे, सचिन पठाडे, स्वच्छ भारत मिशन कक्षातील परमेश्वर हलगे, ज्ञानेश्वर गायकवाड, अविनाश आरळकर, गणेश हरकळ, अशोक भोकरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती
टाकसाळे म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हिताचा असून, त्याची कामे तात्काळ मार्गी लावली पाहिजेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याबाबत योग्य ती दक्षता घेऊन बायोगॅस प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून शेतकऱ्यांना नैसर्गिक खताचा वापर करता येतो, इंधनाची निर्मिती होते, बायोगॅस मधील स्लरीचा खत म्हणून वापर करता येतो तसेच हा प्रकल्प तयार करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध मार्गाने फायदा होतो. त्यामुळे प्रकल्पाचा आणि अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन टाकसाळे यांनी केले.
यावेळी टाकसाळे यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच कृषी विस्तार अधिकारी वसंत ईखे यांच्या उपस्थितीत गावातील तीन शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पाचे मार्कआऊट देण्यात आले.