सेलू : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. याचा फटका महायुतीला बसला. आता विधानसभेलाही तेच वातावरण तयार होत असून सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे प्रचारास गेलेल्या भाजपाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या ताफ्यासमोर युवक व ग्रामस्थांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यामुळे बोर्डीकरांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. जिंतूर विधानसभा मतदार संघात ४१ उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले होते. पक्षीय उमेदवार प्रचाराच्या कामाला लागले आहेत. भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर या दौरे करीत आहेत. जिंतूर मतदारसंघातील भाजप उमेदवार म्हणून मेघना बोर्डीकर यांच्या वाहनाचा ताफा बुधवारी सकाळी ११:३० वा. प्रचारासाठी सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव या गावात पोहोचला. त्यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर युवक व ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासबंधी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी बोर्डीकर यांनी एका मंदिरात दर्शन घेऊन तेथून काढता पाय घेतला. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.