- भास्कर लांडे
पालम ( परभणी ): आजी व माजी आमदारांसह गणेशराव रोकडे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध केले. त्यांनी 17 पैकी 10 जागांवर दणदणीत विजय मिळवीत भाजपकडून सत्ता खेचून आणली. तर उर्वरीतमध्ये रासप 4 आणि पुरस्कृत 1 तर भाजपला 1 आणि पुरस्कृत 1 जाग्यावर समाधान मानावे लागले.
गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपकडे असलेली सत्ता खेचून आणण्यासाठी माजी आमदार सीताराम घनदाट यांनी पालमला एका महिन्यापासून शड्डू ठोकला होता. त्यांनी सर्व हातखंडे वापरल्याने पालममध्ये चार वरून राष्ट्रवादीने दहा जागेवर झेप घेतली. गतवेळी सीताराम घनदाट मित्रमंडळाला 6 जागा जिंकता आल्या होत्या. ते सर्व उमेदवार मागच्यावेळी भाजपला पाठिंबा दिल्याने नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपद खेचून आणले होते. तेव्हा भाजपच्या दोन आणि भाजप पुरस्कृत शहर विकास आघाडीकडे चार जागा जिंकल्या होत्या.
यावेळी भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले असून माजी नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे यांच्यासह त्यांचे बंधू गजानन रोकडे यांनाही पराभव पत्करावा लागला. त्यांनी पुरस्कृत केलेल्या तीन पैकी एका उमेदवाराला विजयापर्यंत पोहोचता आले. दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाने कमाल केली. त्यांनी 11 जागेवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी चार ठिकाणी रासपचा झेंडा फडकला आहे. शिवाय, रासप पुरस्कृत एका उमेदवाराने विजय मिळवल्याचा दावा पक्षाने केला आहे. तर वंचित आघाडी आणि एमआययमसह अपक्षांना खातेही खोलता आले नाही.
मागील वेळी पक्षीय बलाबल :१. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - ४२. भाजप - २३. घनदाट मित्रमंडळ मित्रमंडळ - ६४. शिवसेना - १५. शहर विकास आघाडी ४
2022 चे पक्षीय बलाबल :१. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 10२. भाजप 1 आणि पुरस्कृत 1३. राष्ट्रीय समाज पक्षाच्या 4, पुरस्कृत 1