परभणी : राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या पक्षातील वेगळ्या विचारांचे नेते सहभागी असल्याने त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद आहेत. कोणाचा कोणाला पायपूस नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत येईल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आयोजित सभेत दानवे बोलत होते. व्यासपीठावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. मेघना बोर्डीकर, माजी आ. मोहन फड, रामराव वडकुते, भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, भाजपा उद्योग आघाडीचे मराठवाडा संघटक समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारांचे व पक्षांचे नेते सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये भिन्नता आहे. यातूनच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार आहे. त्यानंतर भाजपाचे सरकार सत्तेत विराजमान होईल. राज्यातील जनतेला भाजपासारखा पक्ष हवा आहे. ते या निवडणुकीतून पुन्हा एकदा स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.